नागपूर : नागपूरला आलेल्या महापुराला आज वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने पुराच्या काळ्या आठवणींसह पुरासाठी कारणीभूत गोष्टींची वर्षभर चर्चा झाली. अंबाझरी तलावाच्या विविकानंद स्मारकाला पाणी अडून ते परिसरातील वस्त्यांमध्ये शिरले, असा अंबाझरी लेआऊटमधील नागरिकांचा दावा आहे. त्यांनी पुतळा हटवण्याची मागणी केली आहे. पुतळा अधिकृत की अनधिकृत हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अंबाझरी लेआऊटमधील रहिवासी आणि निवृत्त अभियंते यशवंत खोरगडे यांच्या घराला पुराचा फटका बसला होता. त्यानंतर त्यांनी पूर कशामुळे आला यांचा तांत्रिक अंगाने अभ्यास करून पुतळा कसा चुकीच्या जागी आहे, याबाबत मुद्दे सरकारपुढे मांडले. पुराच्या वर्षपूर्तीनिमित्त खोरगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, २३ सप्टेंबर २०२३ या दिवसाचे वर्णन ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’,असे करता येईल. जीवावर आलेले संकट घरातील लाखो रुपयांच्या हानीवर निभावले. प्रथम धरण फुटले की काय असे वाटले. घरात ४ फूट, अंगणात ७ फूट पाणी. गेल्या ४५ वर्षात असा पूर लोकांनी पाहिला नव्हता. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात ताशी ९० मिमी. पाऊस पडल्याचे प्रकााशित झाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पावसाचे वर्णन ढगफुटी असे केले.

हे ही वाचा…नागपूर : “एक नेता, एक निवडणूक म्हणजे राष्ट्रहित नव्हे,” साहित्यिक-समीक्षकांचे मत

अंबाझरी तलावाचा विचार केला तर ते ताशी १६५ मिमी. पावसाकरिता तयार केले आहे. त्या तुलनेत झालेला पाऊस कमी होता. त्यामुळे पूर येण्याची खरी कारणे खालील प्रमाणे आहेत.

पूर येण्याची कारणे

१) धरणाची रचना ही ३२० घनमीटर प्रतिसेकंद इतक्या पुराच्या पाण्याची पातळी गृहीत धरून करण्यात आली आहे. त्यानुसार ‘वियर’, स्टिलिंग बेसिन व ‘स्पिल-वे चॅनल’ बांधण्यात येते.

२) महापालिकेने स्पीलवे चॅनलवर स्मारक बांधल्याने विसर्गाचा ९० टक्के पाण्याचा प्रवाह अडवला गेला.
३) लगतचा रस्त्यावर ‘टेल-चॅनल’ करिता जो पूल होता त्याची वहन क्षमता फारच कमी होती. आता तो पूल तोडून नवीन पुलाचे बांधकाम आता सुरू करण्यात आले.

४) पूर्वीचे क्रेझी कॅसल आणि आताचे ‘सेव्हन वाँडर्स’ मधील नदीपात्राची रुंदी अर्धी केलेली आढळली. आता दुप्पट करण्याची निविदा काढतायेत.
५) डागा लेआऊटमधील स्केटिंग रिंगची पार्किंग स्लॅब, जो पाण्याचा प्रवाह अडवून ठेवत होता. पूर आल्यानंतर शासनाने तो तोडला.

६) पुरानंतर नदी सफाई व गाळ काढणे सुरू झाले. सर्व कामे पूर येण्याच्या आधी झाली असती तर प्रसंग टाळता येऊ शकला असता.

हे ही वाचा…नागपूर: पैसे भरूनही ऐनवेळी एअर अँम्बुलन्स कंपन्यानी दिला धोका, माजी कुलगुरूंच्या उपचारासाठी धावाधाव

महापालिकेने न्यायालयात दिलेल्या शपथपत्रात त्यांच्याजवळ धरणासंबंधात माहिती असणारे व्यक्ती नाही, असे स्पष्ट केले. जर असे असेल तर याबाबत माहिती असलेल्या सिंचन विभागाचे त्यांनी ऐकावे. पण तसेही होत नाही. त्यांचा स्मारकाचा विरोध महापालिकेने मोडून काढला. सध्या नवीन पुलाचे बांधकाम व्हीएनआयटीने सांगितल्यामुळे ६३ वर्गमीटर केले जात आहे. टेल चॅनल १८ मीटर बाय ३.५ मीटर करण्यात येत आहे. याचा अर्थ कमीत कमी ६० वर्गमीटर जागा ही जेथून पाण्याचा विसर्ग होतो तेथे हवी आहे. पण, स्मारकाशेजारी फक्त ३५ वर्गमीटर एवढीच जागा आहे. मग हे गणित स्मारक हटवल्याशिवाय कसे जमेल हा प्रश्न आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anniversary of mahapura flood in nagpur recalling its dark memories and causes were discussed throughout year cwb 76 sud 02