नागपूर : नागपूर जिल्ह्यातील मौदा तालुक्यातील भूल्लर या गावी सिमेंटच्या वीटा तयार करणाऱ्या कारखान्यातील बॉयलरचा स्फोट होऊन त्यात एका कामगाराचा मृत्यू झाला. मंगळवार पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. स्फोटाच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता.
या घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला आहे, तर इतर सहा कामगार जखमी झाले आहेत. श्री जी ब्लॉक या नावाच्या खासगी कंपनीत सिमेंटच्या मोठ्या वीट बनवण्याचे काम केले जाते. या कंपनीत ही घटना घडलीय. नंदकिशोर करंडे असं या मृतकाचे नाव आहे. कारखान्यात अचानक स्फोट झाला. त्यामुळे कारखान्यासाठीचे टिन शेड खाली कोसळले आहे.
हेही वाचा – सुधीर मुनगंटीवार अधिकाऱ्यांवर का संतापले?
नागपूर जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून कारखान्यात होणाऱ्या स्फोटांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: बारूद कारखान्यातील स्फोटांचा या घटनांमध्ये अधिक समावेश आहे. त्यामुळे स्फोटाची घटना घडली की बारुद कारखाना होता का याबाबत प्रथम चौकशी केली जाते. कारण बारुद कारखान्यात स्फोट झाला तर त्यात दगावणाऱ्या कामगारांची संख्या अधिक असते. नागपूरजवळील मौदा तालुक्यातील भूल्लर गावी झालेला स्फोट मात्र सिमेंट वीटा तयार करणाऱ्या कारखान्यात झालेला आहे. तेथे काम करणारा नंदकिशोर करांडे याचा या स्फोटात मृत्यू झाला असून सहा कामगार जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपूरमध्ये हलवण्यात आले आहे. स्फोटामागचे कारण काय हे अद्याप कळू शकले नाही. सुरक्षेच्या उपाययोजना कारखान्यात करण्यात आल्या होत्या किंंवा नाही याबाबत तपास सुरू आहे. पोलीस घटनास्थळी रवाना झाले आहेत. ज्या कारखान्यात हा स्फोट झाला तेथे सिमेंटच्या वीटा तयार केल्या जातात. दरम्यान स्फोटामुळे कारखान्याची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली असून मोठ्या प्रमाणात साहित्य परिसरात विखुरले आहे. गावकरीही स्फोटामुळे घाबरले, कशाचा आवाज आला म्हणून ते कारखान्याकडे धावत सुटले. मृत कामगाराच्या कुटुंबियांना घटनेबाबत कळवण्यात आले असून चौकशी सुरू आहे.
हेही वाचा – हुश्श… संततधार पाऊस विश्रांती घेणार, सूर्यनारायण…
अधिकाऱ्याची पाचव्या माळ्यावरून उडी
सीजीओ कॉम्प्लेक्सच्या पाचव्या माळ्यावरून एका अधिकाऱ्याने उडी घेतली. जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. निशांत मृदुल (३५) असे अधिकाऱ्याचे नाव आहे. ही घटना सोमवारी सकाळी घडली. केंद्र शासनाचे सर्व कार्यालय सीजीओ कॉम्प्लेक्समध्ये आहेत. येथील पाचव्या माळ्यावर स्फोटक विभाग आहे. निशांत हे उपस्फोटक नियंत्रक आहेत. निशांत कार्यालयात न बसता वरच्या माळ्यावर येरझारा मारत होते. अचानक त्यांनी उडी घेतली. सुरक्षा रक्षकाने लगेच त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. निशांत बेशुद्ध असल्याने त्यांचे बयान नोंदविता आले नाही. नोंदविल्यानंतरच उडी घेण्याचे कळू शकेल, असे ठाणेदार देशमाने यांनी सांगितले.