अमरावती : बालविवाह रोखण्‍यासाठी कायदा असला  तरी राज्‍यात ही कुप्रथा थांबलेली नाही.  विवाह केल्‍यानंतर जबाबदारीतून मोकळे होता येते, या समजातून मुलीच्‍या शिकण्‍याच्‍या वयात शिक्षण अर्धवट थांबवून तिला विवाहबंधनात अडकविले जाते. आजवर जनजागृती मोहीम राबविण्‍यात आल्‍या. बालविवाहांवर सरकारने कठोर कारवाई सुरू केली. पण, बालविवाह प्रतिबंध कायद्याच्‍या प्रभावी अंमलबजावणीअभावी अनेक भागात मुलींच्‍या मनाविरूद्ध विवाह केले जातात.

अमरावती जिल्‍ह्यातील घाटलाडकी येथे बालविवाहाचे आणखी एक प्रकरण उघडकीस आले असून विवाह लावून देणाऱ्या काझीसह पती आणि ९ जणांच्या विरोधात ब्राम्हणवाडा थडी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अल्पवयीन पीडित मुलगी जेव्हा प्रसूतीसाठी येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झाली, तेव्हा हे प्रकरण उघडकीस आले. पीडित मुलीचा पती हा राजस्थानमधील आहे. शाहरूख शहा असे आरोपी पतीचे नाव आहे. विवाह लावून देणाऱ्या मुलीच्या आई, आजोबाच्या विरोधात देखील गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पीडित अल्पवयीन मुलीचे लग्न फेब्रुवारी २०२३ मध्ये लावून देण्यात आले. त्यानंतर ती पतीकडे राजस्थानमध्ये राहण्यास गेली. प्रसूतीसाठी ती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात दाखल झाली, तेव्हा डॉक्टरांनी आधारकार्डवर तिचे वय तपासले, तेव्हा ती अल्पवयीन असल्याचे निदर्शनास आले. याची माहिती गाडगेनगर पोलिसांना देण्यात आल्यानंतर पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. त्यानंतर या प्रकरणात गाडगेनगर पोलीस ठाण्यात संबंधितांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे स्थळ हे ब्राम्हणवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने आता या प्रकरणात ब्राम्हणवाडा पोलिसांनी विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बालविवाह प्रतिबंधक कायदा काय?

बालविवाह प्रतिबंध कायदा मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. या कायद्याप्रमाणे लग्‍नासाठी मुलीचे वय १८ वर्षे तर मुलाचे वय २१ वर्षे असणे गरजेचे आहे. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल, तरी तो बालविवाह ठरतो. असा विवाह करणारी सज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, पार पाडणारे, हजर असलेले सर्व या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत. ज्या बालक वा बालिकेचा विवाह झाला आहे; त्यांना तो मान्य नसल्यास न्यायालयात अर्ज करून रद्दबादल ठरवता येतो. बालवधूबरोबर लैंगिक संबंध झाले असल्यास ‘पॉक्सो’ कायद्याने गुन्हा दाखल होतो.