नागपूर : Kuno National Park cheetah मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणखी एका मादी चित्त्याचा मृत्यू झाला. कुनोत मृत्यू पावलेल्या चित्त्यांची संख्या आता नऊ झाली आहे. कुनोत आतापर्यंत सहा चित्ते आणि तीन बछडय़ांचा मृत्यू झाला आहे.
मृत पावलेल्या मादीचे नामकरण ‘धात्री’ असे करण्यात आले होते. ‘धात्री’ आणि ‘निरवा’ अशा दोन मादींना कुनोच्या जंगलात सोडण्यात आले होते. त्यातील ‘धात्री’ ही बुधवारी मृतावस्थेत आढळून आली. शवविच्छेदनानंतरच तिच्या मृत्यूचे कारण कळेल असे कुनोच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. या उद्यानात खुल्या पिंजऱ्यात सात नर, सहा मादी व एक मादी बछडय़ाचा समावेश आहे. हे सर्व निरोगी असल्याचे कुनो प्रशासनाचे म्हणणे आहे. कुनो वन्यजीव पशुवैद्यक आणि नामिबियातील तज्ज्ञांचा समावेश असलेल्या चमूद्वारे त्यांच्या आरोग्यावर नियमितपणे लक्ष ठेवले जात आहे. ‘धात्री’ आणि ‘नीरवा’ या दोन्ही मादी अधिवास शोधण्याच्या प्रयत्नात होत्या.
आता कुनोच्या अधिकाऱ्यांनी ‘नीरवा’ ला शोधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, तिचा रेडिओ कॉलर बंद पडल्यामुळे वनाधिकाऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता ते हत्तींचा वापर करून तसेच पाऊलखुणांचा शोध घेऊन या मादीचा मागोवा घेत आहेत. कारण रेडिओ कॉलरमुळे संसर्ग होण्याची भीती अधिकाऱ्यांना आहे. जुलैमध्ये तीन दिवसांच्या कालावधीत दोन नर चित्त्यांचा कुनोत मृत्यू झाला. गेल्या सप्टेंबरपासून नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून कुनो येथे स्थलांतरित झालेल्या २० पैकी नऊ चित्त्यांचा आतापर्यंत विविध कारणांमुळे मृत्यू झाला आहे.