नागपूर शहरातील मानसोपचार तज्ज्ञाने शंभरावर मुली-महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे प्रकरणात पीडितांची संख्या वाढत असून काही मुली व महिलांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता त्या विकृत मानसोपचार तज्ज्ञावर आणखी गुन्हे दाखल होणार असून पोलीस या प्रकरणाचा गांभीर्याने आणि गोपनीयता राखून तपास करीत आहेत. गेल्या दोनच दिवसांपूर्वी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे.
आरोपी विकृत मानसोपचार तज्ज्ञ हा मानेवाडा परिसरात मानसोपचार केंद्र चालवत होता. त्याने सुरुवातीला अनेक पीडित महिलांचा विश्वास संपादन केला. त्यामुळे त्याच्याकडे पीडित महिला व तरुणींसह अल्पवयीन मुलीची संख्या वाढली. गुरुवारी आणखी एका तरुणीने लेखी तक्रार दिल्याची माहिती समोर आली आहे. विकृत मानसोपचार तज्ज्ञ गेल्या १३ वर्षांपासून उपचार करीत होता. त्याच्याकडे त्यावेळी अल्पवयीन असलेल्या मुलींचे आता लग्न झाले आहे. तसेच त्याच्याकडे काही अश्लील चित्रफितीसुद्धा होत्या. त्यामुळे पोलीस तक्रार केल्यास संसार विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काही विवाहित महिला पुढे येण्यास धजावत नाहीत. मात्र, काही तरुणींना पोलिसांनी विश्वासात घेतले आहे. त्यांच्या नावाबाबत गोपनीयता ठेवण्याचे आश्वासन पोलीस देत आहेत. त्यामुळे काही तरुणी-महिला स्वत:हून समोर येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा >>>बहुचर्चित संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे चंद्रपूर कनेक्शन
विद्यार्थिनीलाही ओढले जाळ्यात
विकृत मानसोपचार तज्ज्ञाच्या केंद्रात मानसोपचार अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारी एक तरुणी मदतनीस म्हणून काम करीत होती. त्याने तिलाही प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्न करण्याचे आमिष दाखवले. मात्र, लग्न करण्यास टाळाटाळ करीत होती. त्यामुळे तिने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्याने आपल्या विद्यार्थिनीशी प्रेमविवाह केला होता. तीसुद्धा पतीच्या कुकृत्यात सहभागी होती. तसेच त्याची आणखी प्रेयसीसुद्धा त्याला सहकार्य करीत होती, अशी माहिती समोर आली आहे.