भंडारा : शेतात पिकाची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करुन ठार केल्याची घटना शुक्रवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शेतशिवारात घडली. या ‘सीटी – १’ वाघाची ही तेरावी शिकार असून तालुक्यातील चौथी घटना आहे. तेजराम बकाराम कार (४५) रा. कन्हाळगाव असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी तेजराम गावातील मनोज शालिक प्रधान (३०) याच्यासोबत शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते.
हेही वाचा : बारा जणांचा बळी घेणाऱ्या ‘सीटी-१’ या नरभक्षी वाघाला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम
पिकाची पाहणी करून शेळ्यांसाठी चारा म्हणून झाडाच्या फांद्या तोडावयास गेलेल्या तेजरामवर वाघाने अचानक हल्ला चढविला. सोबत असलेल्या मनोजने आरडाओरड करण्यास सुरवात केली. घटनेची माहिती मोबाईलवरून गावकऱ्यांना दिली. दरम्यान, गावकऱ्यांनी वनविभागाला माहिती देताच वनपरिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्वात वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलीस व वन कर्मचाऱ्यांनी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. या वाघाला लवकरात लवकर जेरबंद करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.