नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प म्हणजे जगभरातील पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र. येथे वाघ हमखास दर्शन देतात असाच पर्यटकांचा अनुभव! मात्र, व्याघ्रप्रकल्पातील क्षेत्रफळाच्या तुलनेत आता येथे वाघ मावेनासे झाले. जेवढे वाघ व्याघ्रप्रकल्पात तेवढेच आणि किंबहुना त्यापेक्षाही जास्त वाघ व्याघ्रप्रकल्पाच्या बाहेर. त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष येथे पराकोटीला पोहचलाय. त्यातूनच मग वाघांच्या कृत्रिम स्थानांतरणाचा निर्णय घेण्यात आला.
ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातून आणखी एक वाघीण गुरुवारी नागझिरा अभयारण्यात सोडण्यात आली. मे २०२३ मध्ये वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत नागझिरा अभयारण्यात दोन वाघिणी सोडण्यात आल्या होत्या. त्यातील एक वाघीण काही कालावधीनंतर मध्यप्रदेशात गेली. तर एक वाघीण अभयारण्याच्या सीमेवर आहे. चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झालेला असतानाच वाघाच्या मृत्यूच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. तर दुसरीकडे नागझिरा अभयारण्यात २० वाघांची क्षमता असूनही त्याठिकाणी वाघांची संख्या कमी आहे.
हेही वाचा : नाट्यमय घडामोडींमुळे राजकीय समीकरणे बदलल्याचा फायदा कोणाला ?
ताडोबा व नागझिराची एकूणच स्थिती पाहता ताडोबातील पाच वाघ नागझिरा अभयारण्यात सोडण्याचा निर्णय वनमंत्री सुधीर मुनंटीवार यांनी घेतला होता. त्यानुसार मे २०२३ मध्ये दोन वाघिणी वनमंत्र्यांच्या उपस्थितीत नागझिऱ्यात सोडण्यात आल्या. तर बुधवारी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या गाभा क्षेत्रातून एका वाघिणीला पशुवैद्याकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे व त्यांच्या चमुने जेरबंद केले. या वाघिणीची वैद्याकीय तपासणी करुन डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेच्या सहकार्याने उपग्रह जीपीएस कॉलर लावण्यात आली. त्यानंतर तीची वैद्याकीय तपासणी करुन नागझिरा अभयारण्यात आणण्यात आले. अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) पूर्व यांच्या उपस्थतीत या वाघिणीला नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात निसर्गमुक्त करण्यात आले. यावेळी नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचे क्षेत्रसंचालक जयरामेगौडा आर. यांच्या मार्गदर्शनात हा उपक्रम यशस्वी करण्यात आला.
हेही वाचा : वंचितचे प्रकाश आंबेडकर म्हणतात, “देशाचा पंतप्रधान गल्लीतल्या गुंडासारखा वागू शकत नाही, मात्र मोदी…”
यावेळी ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक नंदकिशोर काळे, गोंदियाचे उपवनसंरक्षक प्रमोद पंचभाई, उपवनसंरक्षक राहुल गवई, नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पाचे उपसंचालक पवन जेफ, मानद वन्यजीव रक्षक सावन बाहेकर, मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान तसेच इतरही मानद वन्यजीव रक्षक तसेच वनखात्याचे अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.