सालेकसा तालुक्यातील समृद्ध किसान शेती उद्योग साधन सामुग्री पुरवठा व खरेदी विक्री सेवा सहकारी संस्थेत एक कोटी ५५ लाख २० हजार रुपयांचा धान घोटाळा झाल्याचे उघडकीस आले असतानाच गोर्रे येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेतही एक कोटी ७७ लाख ३७ हजार ९३८ रुपयांचा धान आणि बारदाना घोटाळा समोर आला आहे. याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी १४ संचालकांवर गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : साईबाबा प्रकरणात कुणाचे चुकले? काय चुकले?

गोर्रे येथील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने २१२१-२२ या आर्थिक वर्षात शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरिपात एकूण १४५८०.४० क्विंटल तसेच रब्बी हंगामात ३१०१५. ४० क्विंटल असा एकूण ४५५९५.८० क्विंटल धान खरेदी केले होते. त्यापैकी ३६८३२.३३ क्विंटल धानाचा पुरवठा करण्यात आला. त्यानुसार ८७६३.४७ क्विंटल धान शिल्लक असणे गरजेचे होते. परंतु, आदिवासी विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय भंडाराचे लेखा व्यवस्थापक सामर सुदेशराव भागवत यांनी १२ ऑक्टोबर रोजी या संस्थेच्या गोदामात केलेल्या तपासणीत केवळ १५० क्विंटल धानसाठा शिल्लक असल्याचे आढळले. यावरून ८६१३.४७ क्विंटल धानाची अफरातफर झाल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा : दुर्दैवी! बैलांना पाणी पाजण्यासाठी तलावात गेले; पण पाण्याचा अंदान न आल्याने शेतकऱ्यासह…

हे धान एक कोटी ६७ लाख १० हजार १३१.८० रुपये किंमतीचे आहेत. तसेच २५६३४ जुना व नवीन बारदाना गोदामातून गायब असल्याचे समजले. या बारदाण्याची किंमत १० लाख २७ हजार ८०७ रुपये इतकी आहे. असा एकूण एक कोटी ७७ लाख ३७ हजार ९३८.८० कोटी रुपयांचा घोटाळा या संस्थेने केला आहे.

हेही वाचा : गडचिरोली : आलापल्ली वन विभागाच्या ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांमुळे कर्मचारी त्रस्त

याप्रकरणी सालेकसा पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष संतोष मडावी, संचालक अनिल फुंडे, शिवाजी कोसमे, अरुण फुंडे, जयलाल पटले, हिरामण जिंदाखोर, झाडू गावड, गोटूलाल टेकाम, रामजी सिरसाम, मुंजा इंगळे, सी.डी. जुगनाके, गजानन मरस्कोल्हे, व अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.गोर्रे येथील संस्थेच्या संचालकांवर या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी संचालक फरार आहेत. आरोपींना पकडण्याकरिता दोन पोलीस पथक तयार करण्यात आले आहे. – बी.डी. बोरसे, पोलीस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, गोंदिया

Story img Loader