नागपूर : उन्हाळ्यात रेल्वेगाड्यांना गर्दी होत असल्याने रेल्वेने मुंबईहून (सीएसएमटी) नागपूरसाठी एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त गर्दी लक्षात घेता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि नागपूर दरम्यान एक विशेष गाडी सोडण्यात येत आहे. ग्रीष्मकालीन सुट्ट्यांमध्ये प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथून नागपूरकडे एकफेरी विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. गाडी क्रमांक ०१०१७ सीएसएमटी-नागपूर एक फेरी विशेष गाडी खालीलप्रमाणे चालविण्यात येईल.
सीएसएमटी -नागपूर एकफेरी विशेष गाडी २७ एप्रिल २०२५ रोजी सीएसएमटीवरून रात्री १२.३० वाजता प्रस्थान करेल आणि त्याच दिवशी दुपारी ३.३० वा वाजता नागपूर येथे पोहोचेल.
ही गाडी दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मळखेड, शेगाव, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबणार आहे. या गाडीमध्ये एकूण २१ डब्यांची असेल. त्यामध्ये दोन एसएलआर/डी, सहा सामान्य श्रेणी, १० स्लीपर, दोन एसी थ्री-टियर आणि एक एसी टू-टियर डब्यांचा समावेश आहे.
रीवा – चारलापल्ली विशेष गाडी
प्रवाशांच्या सोयीसाठी नागपूर विभागातून रीवा – चारलापल्ली – रीवा दरम्यान विशेष गाडीची सेवा देण्यात येत आहे. गाडी क्रमांक ०१७०४/०१७०३ रीवा – चारलापल्ली – रीवा एक्सप्रेस विशेष गाडी अतिरिक्त भाडे आकारून चालविण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०१७०४ रीवा – चारलापल्ली द्वै-साप्ताहिक विशेष गाडी २४ एप्रिल ते २५ मे दर गुरुवार व रविवार दुपारी १ वाजता रीवा येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २.४५ वाजता चारलापल्ली येथे पोहोचेल. ही गाडी नागपूर स्टेशनवर दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० वाजता येईल आणि पहाटे ४.३५ वाजता निघेल.
गाडी क्रमांक ०१७०३ चारलापल्ली – रीवा द्वै-साप्ताहिक विशेष गाडी दिनांक २५ एप्रिल ते २६ मे दर शुक्रवार व सोमवार सायंकाळी ४.५५ वाजता चारलापल्ली येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ३.३० वाजता रीवा येथे पोहोचेल. ही गाडी नागपूर स्टेशनवर दुसऱ्या दिवशी सकाळी ६.२० वाजता येईल आणि ६.२५ वाजता निघेल.
ही विशेष गाडी सतना, मैहर, कटनी मुडवारा, दमोह, सागर, बीना, राणी कमलापती, इतारसी, जुझारपूर, बेतूल, आमला, नागपूर, बल्लारशाह, शिरपूर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचेरियल, पेद्दापल्ली, काझीपेट, जंगावन या स्थानकांवर निर्धारित वेळेनुसार थांबेल.