गोंदिया : देशांतर्गत आणि राज्यात दहशतवादी घटना घडत असतात. जिल्ह्यात शांतता, सुव्यवस्थेसाठी सर्वत्र ‘मॉक ड्रील’ मोहीम एखाद्या गंभीर घटनेला सामोरे जाण्याच्या दृष्टीने राबवण्यात येते. यातून प्रशासकीय यंत्रणा कितपत तत्पर आहे, काय उणिवा आहेत, याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि पुढील काळात त्या होणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येते. त्या अनुषंगाने गोंदिया येथील बिरसी विमानतळावर जिल्हा आणि पोलीस प्रशासनाकडून सोमवारी सायंकाळी ‘अँटी हायजॅकिंग मॉक ड्रिल’चे आयोजन करण्यात आले होते.
३ सशस्त्र दहशतवाद्यांनी बिरसी विमानतळावरील प्रवासी विमानातील प्रवाशांना वेठीस धरल्याची माहिती विमानतळ सुरक्षा यंत्रणेकडून मिळताच पोलिसांचा फौजफाटा तातडीने घटनास्थळी पोहोचला. त्यांनतर कोणतीही जीवित अथवा वित्तहानी न होऊ देता दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात आले. जखमींना रुग्णवाहिकेद्वारे दवाखान्यात पाठविण्यात आले. वेठीस धरलेल्या प्रवाश्यांना मोकळे करण्यात आले.
हेही वाचा >>>फडणवीसांच्या जिल्ह्यातच जलयुक्त शिवारची कामे अर्धवट, शेतकऱ्यांना फटका
अँटी हायजॅकिंग मॉक ड्रील मोहिमेत जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक बनकर, बिरसी विमानतळ संचालक शफीक शहा, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील ताजने, पोलीस उपअधीक्षक नंदिनी चांदपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली दहशतवाद विरोधी पथक, बिडीडीएस पथक, पोलीस मुख्यालय येथील पोलीस पथक, पो. ठाणे रावणवाडी, गोंदिया ग्रामीण येथील पोलीस पथक, अंगुलीमुद्रा विभाग, विमान सुरक्षा दल व कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, अग्निशामक दल व जलद कृती दल, दंगल नियंत्रण (आरसीपी दोन पथके), बिनतारी संदेश विभाग, मोटर परिवहन विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा सुरक्षा शाखा, जिल्हा विशेष शाखा, नक्षल सेल येथील पोलीस अधिकारी अंमलदार इत्यादींनी सहभाग नोंदविला.