नक्षलवादीविरोधी मोहिमेत शैथिल्य

दि. १३ डिसेंबर, खबर क्रमांक १ – भामरागड परिसरात ३० ते ४० नक्षलवाद्यांचा एक गट गावागावांत फिरत असून आगाऊ सूचना दिल्यावरसुद्धा शहीद सप्ताहात फलक न लावणाऱ्या तसेच रस्त्यावर झाडे न टाकणाऱ्या गावकऱ्यांची एक बैठक त्यांनी १५ डिसेंबर (म्हणजे आज) गुडूरवाहीला बोलावली आहे.

दि. १५ नोव्हेंबर, खबर क्रमांक २ – ताडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत पडतेमपल्ली कसूनसूरच्या दरम्यान पेरेमिली दलमचे साईनाथ व दिनेश १५ नक्षलवाद्यांसह गावात बैठका घेत आहेत. यात दोन महिला आहेत.

दि. २८ नोव्हेंबर, खबर क्रमांक ३ – भामरागड भागातील कोयारकोठी गावाजवळ २५ नक्षलवादी दिवसभरापासून थांबले आहेत. त्यांच्यापैकी निम्मे निरगुडवंचा गावात गेले, तर उर्वरित गुडूरवाही गावात पीएलजीए सप्ताह यशस्वी करण्यासाठी बैठका घेत आहेत. येते २ दिवस ते याच परिसरात राहणार असून पुलनारला बैठक घेणार आहेत. मी त्यांच्यासोबत असून पिवळा सदरा घातलेला आहे. कारवाई करताना कृपया काळजी घ्यावी.

दि. २९ नोव्हेंबर, खबर क्रमांक ४ – भामरागड विभागाचे नक्षल डोबूर धबधब्याजवळ मुक्कामी असून यात अनेक वरिष्ठांचा समावेश आहे.

दि. २७ नोव्हेंबर, खबर क्रमांक ५ – भामरागडपासून ८ कि.मी. अंतरावरील अलदंडी व मरोडपल्ली गावादरम्यान पामुलगौतम नदीजवळ शिबीर लावत आहेत.

दि. १५ नोव्हेंबर, खबर क्रमांक ६ – ताडगाव हद्दीत माडवेली गावाजवळ हातात एके ४७ व एसएलआर घेतलेले २० ते २५ नक्षलवादी फिरत असून त्यातील काही चेहरे अनोळखी आहेत.

नक्षलवाद्यांचा बीमोड करण्यासाठी नेमण्यात आलेल्या सुमारे १३ हजार सशस्त्र पोलीस जवानांचे नेतृत्व करणारे गडचिरोलीचे उपमहानिरीक्षक शिवाजी बोडखे व पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांना खबऱ्यांनी मोबाइलवर पाठवलेले हे लघुसंदेश आहेत. अशा वर्षभरातील संदेशांची यादीच ‘लोकसत्ता’जवळ उपलब्ध असून वेळेत माहिती मिळूनही या अधिकाऱ्यांनी शोधमोहिमा न राबवल्याने सध्या नक्षलवाद्यांना मोकळे रान मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांत नक्षलवाद्यांचा हिंसाचार कमी झाला, या आनंदात राज्याचे गृह खाते असले तरी प्रत्यक्षात हिंसाचार कमी करणे ही नक्षल्यांची रणनीती असून त्याकडे दुर्लक्ष करीत गाफील राहणाऱ्या या यंत्रणेमुळे चळवळीची पाळेमुळे अधिक घट्ट करण्यासाठी नक्षल्यांना पुरेसा वेळ मिळू लागला आहे. सध्या गडचिरोली व गोंदिया जिल्ह्य़ांत नक्षलवादी अगदी बिनधास्त फिरत असून मुख्यमंत्र्यांकडे असलेल्या गृह खात्याचे त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. वर उल्लेख केलेल्या सर्व लघुसंदेशांत ज्या गावांची नावे नमूद आहेत तेथून पोलीस ठाण्याचे अंतर कमीत कमी ३ ते जास्तीत जास्त ७ किलोमीटर आहे. गनिमी युद्धाचे प्रशिक्षण घेतलेले जवान या संदेशाच्या आधारावर सहज शोधमोहीम आखून नक्षल्यांचा वेध घेऊ शकत होते, पण अधिकाऱ्यांनी त्याची दखलच न घेतल्याने आता खबरेही हैराण झाले आहेत. शासनाच्या नक्षलवादविरोधी मोहिमेचे लक्ष्य ही चळवळ मुळापासून उखडून टाकणे, हे असताना अशी निश्चित माहिती मिळूनही मोहिमा का आखल्या जात नाहीत, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. वर उल्लेख केलेल्या खबर क्रमांक ३ ची दखल अधिकाऱ्यांनी खूप उशिरा घेतली व जवान २४ तास उशिराने पुलनार गावात पोहोचले तोवर नक्षलवादी बाजूच्या टेकडीवर चढले होते. ही खबर ज्या पिवळा शर्ट घातलेल्या मुलाने दिली, त्यानेच नंतर आम्ही जवानांना टेकडीवरून बघितले, असा संदेश मध्यस्थामार्फत अधिकाऱ्यांना दिला. गडचिरोली व गोंदियात काम करणारे जवान तेच आहेत. अधिकारी मात्र दर दोन वर्षांनी बदलतात. त्याचा विपरीत परिणाम या मोहिमेवर होत असून गेल्या दोन वर्षांत अधिकाऱ्यांनी धोका पत्करणेच बंद केल्याने नक्षलवादविरोधी मोहीम कमालीची थंडावली आहे.

घसरता आलेख

या वर्षांत ३१ ऑक्टोबपर्यंत गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी १८ सामान्य नागरिक व ३ पोलिसांसह २१ जणांना ठार केले. पोलिसांनी ११ नक्षलवादी ठार केल्याचा दावा केला असला तरी त्यातील ३ आंध्रच्या ग्रेहाऊंडने, तर ३ छत्तीसगड पोलिसांनी मारले. प्रत्यक्षात राज्याच्या यंत्रणेने केवळ ५ नक्षलवादी ठार मारले. २०१५ मध्ये नक्षलवाद्यांनी २ पोलीस व १८ नागरिकांना ठार केले, तर पोलिसांनी केवळ २ नक्षलवादी ठार केले. २०१४ मध्ये २५ नागरिक व पोलीस ठार झाले, तर १३ नक्षलवादी ठार झाले. २०१३ मध्ये पोलिसांनी २३ नक्षलवाद्यांना ठार केले. या वर्षी १८ नागरिक व पोलीस ठार झाले.

नक्षलविरोधी अभियान पांढरा हत्ती

नक्षलविरोधात जवानांना प्रशिक्षित करण्यासाठी व राज्यभरातील त्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी येथील सुराबर्डीला स्थापन करण्यात आलेले नक्षलविरोधी अभियान केंद्र कर्मचारी व अधिकारीच नसल्याने ओस पडले आहेत. पोलीस उपमहानिरीक्षकाचा अपवाद वगळता येथील बहुतांश पदे रिक्त आहेत. येथे आधी जवान व अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जायचे. तेथे मार्गदर्शन करण्यासाठी वक्तेच मिळेनासे झाले म्हणून मग कुणाला बोलवायचे, असा प्रश्न निर्माण झाल्याने हे प्रशिक्षणसुद्धा सध्या थांबवण्यात आले आहे.

केवळ नक्षलवादी मारून हा प्रश्न सुटणारा नाही. सध्या आम्ही मत व मन परिवर्तनावर लक्ष केंद्रित केले आहे. अनेकदा खबरे माहिती देतात, पण अंतर व परिस्थितीमुळे मोहीम हाती घेणे शक्य होत नाही. या संदर्भात ज्याला शंका असेल त्याने मला भेटावे.

 – शिवाजी बोडखे, पोलीस उपमहानिरीक्षक

Story img Loader