चंद्रपूर : मोदी विरोधी लाट, शेतकरी, शेतमजुरांची नाराजी, बहुजन, दलित व मुस्लीम समाजाची विरोधात गेलेली गठ्ठा मते, महागाई, बेरोजगारीसोबतच संविधान बदलाचा घरोघरी झालेला प्रचार यामुळेच कोट्यवधींची विकास कामे करूनही राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य तथा मत्स्य व्यवसाय मंत्री व चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा २ लाख ६० हजार मतांनी पराभव झाला. मुनगंटीवार यांचा पराभव भाजपसाठी चिंता व चिंतनाचा विषय ठरला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुनगंटीवार लोकप्रिय अभ्यासू नेते आहेत. त्यांच्या कामाची धडाडी सर्वश्रूत आहे. गेल्या साडेसात वर्षात त्यांनी जिल्ह्यात कोट्यवधींची विकास कामे केली. केंद्रीय सैनिक शाळा, एसएनडीटी विद्यापीठ, बॉटनिकल गार्डन, वन अकादमी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कॅन्सर हॉस्पिटल, अमृत पाणीपुरवठा योजनेपासून शेकडो विकास कामे केली. त्यांच्या कामाचा धडाका पाहून त्यांना इच्छा नसतानाही केंद्रीय नेतृत्वाने जबरदस्तीने लोकसभेच्या रिंगणात उतरवले. ही पहिली चूक भाजप व मुनगंटीवार यांच्या पराभवाला कारणीभूत ठरली. पक्षश्रेष्ठींनी दिलेली जबाबदारी पार पाडायचीच, मग पराभव झाला तरी चालेल या भूमिकेतून मुनगंटीवार निवडणुकीला सामोरे गेले.

हेही वाचा…नितीन गडकरींना फडणवीसांच्या मतदारसंघाहून अधिक मताधिक्य खोपडेंच्या मतदारसंघात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मोरवा येथील जाहीर सभेनंतर मुनगंटीवार खऱ्या अर्थाने प्रचाराच्या रिंगणात उतरले. मात्र, मोदी यांच्याच सभेत मुनगंटीवार यांनी केलेले ‘भाऊ-बहिणी’ बद्दलचे वादग्रस्त वक्तव्य त्यांच्या अंगलट आले. काँग्रेसने या वक्तव्याची चित्रफीत समाजमाध्यमावर अशा पद्धतीने फिरवली की मुनगंटीवार यांना यातून सावरायला बराच कालावधी लागला. तसेच मोदीं विरोधातील सुप्त लाटेचाही फटका मुनगंटीवार यांना बसला. सोयाबीन, कापसाला हमीभाव नसल्यामुळे शेतकरी, शेतमजूर भाजपच्या विरोधात गेले. ‘निर्भय बनो’च्या सभेनंतर भाजप विरोधात वातावरण निर्मिती झाली. त्यात घरोघरी संविधान बचाव हा संदेश पोहचवण्यात काँग्रेसला यश आले. त्याचाही फटका मुनगंटीवार यांना बसला. या मतदारसंघात कुणबी व बहुजन समाजाचे प्राबल्य आहे. तर मुनगंटीवार आर्य वैश्य समाजाचे प्रतिनिधित्व करतात. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीतच आर्य वैश्य समाजाचा ओबीसीत समावेश करण्याचे पत्र निघाले. त्यामुळे मराठा – ओबीसींमध्ये भाजप नेत्यांनी लावलेल्या भांडणात ओबीसी समाज नाराज होता. त्यात आर्य वैश्यांच्या ओबीसी समाजात प्रवेशाच्या या पत्राने तेल ओतण्याचे काम केले. त्याचा परिणाम संपूर्ण बहुजन समाज भाजपच्या विरोधात गेला.

संविधान बदलाच्या मुद्यावर दलित समाज हा भाजपच्याविरोधात होताच तर मुस्लीम द्वेषामुळे मुस्लीम देखील दुरावल्या गेले. त्याचा सर्वाधिक फटका मुनगंटीवार यांना या लोकसभा निवडणुकीत बसला. बहुजन, दलित व मुस्लीम समाजाची गठ्ठा मते विरोधात गेल्याने मुनगंटीवार यांचा विकासाचा मंत्र यासमोर टिकू शकला नाही. मतदारांनीही विकास ऐवजी या निवडणुकीत जातीला प्राधान्य दिल्याचे येथे प्रकर्षाने दिसून आले. त्यामुळे आज पराभव झाला असला तरी बहुसंख्य मतदार मुनगंटीवार यांच्या पराभवाने चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाचे मोठे नुकसान झाले अशीच प्रतिक्रिया देत आहे.

हेही वाचा…उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण नाशिक, जालना, नागपुरात; ‘या’ जिल्ह्यात मृत्यूची नोंद…

महायुती सरकारमध्ये सहभागी असूनही अपक्ष आमदार जोरगेवार शेवटच्या दिवशी प्रचारात उतरले, तर मागासवर्गीय आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहीर यांनी प्रचारातून अंग काढून घेतले. त्याचाही फटका मुनगंटीवार यांना या निवडणुकीत बसला. भाजपमध्ये पदाधिकारी असलेल्या अनेक कुणबी समाजाच्या नेत्यांनी मनातून प्रचार केलाच नाही. शरीराने मुनगंटीवार यांच्यासोबत असलेले अनेक जण अर्थकारणाचा खेळ खेळून काँग्रेस सोबत होते. भाजपातील महापालिकेच्या राजकारणात सक्रिय असलेली गोल्डन गँगही प्रचारातून अंग काढून होती. त्यातच महागाई, बेरोजगारीमुळे महिला व तरुण वर्ग भाजपपासून दुरावला गेला. एकूणच मुनगंटीवार यांचा दारुण पराभव भाजपसाठी चिंता व चिंतनाचा विषय ठरला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anti modi wave and caste dynamics lead to sudhir mungantiwar s defeat by 2 lakh 60 thousand votes in chandrapur rsj 74 psg