नागपूर : शहरातील प्रमुख लोकवस्ती असलेल्या पांडे ले-आऊटमधील उद्यान महापालिकेच्या अक्षम्य दुर्लक्षाचे बळी ठरले आहे. उद्यानात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य आहे, मुलांसाठी असलेली खेळणी तुटलेली आहे. विशेष म्हणजे येथे रात्री असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खामला प्लॉट होल्डर को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, पांडे ले-आऊटमध्ये नंद उद्यान आहे. या उद्यानाच्या शेजारी बास्केट बाॅल मैदान व सोसायटीसाठी मोकळी जागा आहे. दुसऱ्या बाजूला जलकुंभ आहे. ही सोसायटी १९६३ मध्ये स्थापन झाली. त्यानंतर येथे उद्यान विकसित करण्यात आले.

सुरुवातील या ले-आऊटकडे महापालिकेचे लक्ष होते. त्यामुळे उद्यानातील वृक्ष लागवड व खेळणी हे परिसरातील नागरिकांसाठी आकर्षणाचे केंद्र होते. परंतु, आता या उद्यानाची दयनिय अवस्था झाली आहे.

पांडे ले-आऊटची वस्ती दहा हजारांची आहे. येथे सायंकाळी मुले मोठ्या संख्येने पालकांसह येतात. जयप्रकाश नगरपर्यंतचे लोक उद्यानात फिरायला येतात. परंतु, महापालिका प्रशासनाला या उद्यानाकडे बघायला वेळ नाही. या उद्यानातील झाडे पाण्याअभावी वाळत आहे. स्वच्छता कर्मचारी येथे येत नसल्याने सर्वत्र कचरा पडला आहे. उद्यानाच्या कोपऱ्यात कचऱ्याचे ढीग लागल्याचे दिसून येत आहे.

एवढेच नव्हेतर सुरक्षा रक्षक नसल्याने रात्री या उद्यानात असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला आहे, असे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. कचरा, पाण्याच्या, दारुच्या आणि बियरच्या रिकाम्या बाटल्या येथे पडलेल्या दिसतात. तसेच उद्यानातील खेळणीही तुटलेली आहे.

हवनकुंड की कचराकुंडी? या उद्यानात हनुमान मंदिर आहे. त्यासमोर हवनकुंड आहे. या हवनकुंडात पाण्याच्या रिकाम्या बॉटल आणि कचरा टाकण्यात आला आहे. रात्रीच्या वेळेस येथे पुरेशी प्रकाश व्यवस्थाही नसते. त्याचा फायदा असामाजिक तत्त्व घेताना दिसतात. रात्रीच्या वेळी महिलांना या उद्यानाच्या जवळून जाण्याचीही भिती वाटते, असे पांडे ले-आऊटमधील काही महिलांनी सांगितले.