नागपूर : ‘अँटीमायक्रोबियल रेझिस्टन्स’ (एएमआर) हे मानवासाठीच नाही तर प्राणी, वनस्पती आणि पर्यावरणासाठीही धोकादायक आहे, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) नागपूर शाखेकडून दिली गेली.
आयएमएच्या अध्यक्षा डॉ. वंदना काटे म्हणाल्या, ‘एएमआर’मुळे दरवर्षी सात लाख रुग्णांचा मृत्यू होतो. ते २०५० पर्यंत १० दशलक्ष मृत्यूंपर्यंत वाढण्याचा धोका आहे. करोनातही एवढे मृत्यू झाले नव्हते. त्याहून ते जास्त आहे. रुग्णांकडून तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला न घेता थेट औषध विक्रेते आणि चुकीच्या व्यक्तीकडून औषधांचा सल्ला घेऊन त्याचे सेवन केल्याने हा प्रकार वाढतो. १९८७ पासून शास्त्रज्ञ कोणतेही नवीन प्रतिजैविक रेणू विकसित करू शकले नाहीत. त्यामुळे सध्याच्या प्रतिजैविकांचा विवेकपूर्ण वापर महत्त्वाचा आहे.
डॉ. कमलाकर पवार म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने एएमआरला जागतिक सार्वजनिक आरोग्य धोक्यांपैकी एक म्हणून घोषित केले आहे. त्याच्याशी सामना करण्यासाठी भारतानेही पावले उचलली आहेत.
हेही वाचा – नागपूर : महामेट्रोच्या अधिकारी भरती घोटाळ्याची चौकशी करा, अजित पवार गटाची मागणी
डॉ. शैलेश गहूकर म्हणाले, १८ नोव्हेंबर ते २४ नोव्हेंबर हा ‘एएमआर’ जागरूकता सप्ताह म्हणून साजरा केला जाणार असून त्यानिमित्त विविध जनजागृतीपर कार्यक्रम आयएमए आयोजित करेल. सगळ्याच क्षेत्रांनी प्रतिजैविक औषधांचा गरजेनुसारच वापर करण्याची गरज आहे. नाहक ही औषधे सेवन करण्याची गरज नाही. बऱ्याच आजारात या औषधांची गरजच नसते. आयएमए देशातील १,७०० शाखेत जनजागृती मोहीम राबवणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी डॉ. मंजूषा गिरी आणि इतरही आयएमएचे पदाधिकारी उपस्थित होते.