अकोला : अकोला लोकसभा मतदारसंघातून भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांनी विजयश्री मिळवत पक्षाचा गड कायम राखला. अनुप धोत्रे यांनी आपले आजोबा व वडिलांचा राजकीय वारसा जोपासला आहे. जीवनातील पहिलीच थेट लोकसभा निवडणूक लढवत त्यांनी विजयाला गवसणी घातली. आता युवा खासदारांकडून अकोलेकरांना विकासाच्या मोठ्या अपेक्षा राहणार आहेत.
अकोल्यातील भाजपचे नवनिर्वाचित खासदार अनुप धोत्रे यांना राजकीय वारसा लाभला आहे. त्यांचे आजोबा श्यामराव धोत्रे हे आमदार होते. त्यानंतर वडील संजय धोत्रे यांची तीन दशकावून अधिक काळाची यशस्वी राजकीय कारकीर्द आहे. संजय धोत्रे यांनी सर्वप्रथम मुर्तिजापूर मतदारसंघातून विधानसभेत प्रतिनिधित्व केले. २००४ मध्ये त्यांना अकोल्यातून भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. लोकसभेवर सलग चार निवडणुकांमध्ये ते विक्रमी मताधिक्याने निवडून गेले.
हेही वाचा – राज्यात आज पावसाचा ‘येलो अलर्ट’, पूर्व मोसमी पावसाची हजेरी
२०१९ मध्ये त्यांची नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून वर्णी लागली. तीन वर्षानंतर प्रकृती अस्वस्थामुळे त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. गेल्या दोन वर्षांपासून ते राजकारणापासून देखील दूर आहेत. आपल्या वडिलांचा वारसा चालविण्यासाठी अनुप धोत्रे सक्रिय झाले. या अगोदर कधी निवडणूक लढली नसली तरी वडिलांच्या निवडणुकीच्या नियोजनाची जबाबदारी त्यांच्यावर नेहमी राहतच होती. अनुप धोत्रे यांच्यावर अकोला लोकसभा निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी देत पक्षाने त्यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले होते. त्या दृष्टीने ते कामाला लागले.
तळागाळातून जनसंपर्क वाढविण्यासोबतच पक्षसंघटन मजबुतीवर त्यांनी भर दिला. त्याचा लाभ त्यांना निवडणुकीत झाला. ४० वर्षीय अनुप धोत्रे यांचे पुणे येथील सिंबायोसिस महाविद्यालयातून बी.कॉम.चे शिक्षण झाले असून औद्योगिक वसाहतीमध्ये त्यांचा उद्योग समूह आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकरी असण्यासह कृषी विज्ञान केंद्राचे सचिव म्हणून ते कार्यरत आहेत. ग्वाल्हेर येथील जीआयसीटीएस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे ते सचिव आहेत, तसेच अभिनव बाल शिक्षण प्रशिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष आहेत. अकोला येथील नीळकंठ सहकारी सूतगिरणीचे संचालक म्हणूनही ते कार्यरत आहेत. त्यांच्या आई सुहासिनी धोत्रे भाजप महिला आघाडीच्या पदाधिकारी आहेत. पत्नी समीक्षा या गृहिणी असून त्यांना तीन अपत्ये आहेत. अनुप धोत्रे शांत, मनमिळावू व अभ्यासू वृत्तीचे म्हणून ओळखले जातात. सक्षम पक्ष संघटन, वडिलांची पुण्याई, गठ्ठा मतदार, आमदार रणधीर सावरकर यांचे चोख नियोजन यामुळे अनुप धोत्रे यांनी अटीतटीच्या लढतीमध्ये भाजपचे वर्चस्व कायम राखले. नव्या खासदारांकडून मतदासंघांतील विकास कामे मार्गी लावून विविध प्रश्न सोडविण्याची आशा अकोलेकरांना राहणार आहे.
© The Indian Express (P) Ltd