अकोला : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने अकोला मतदारसंघातून अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर केली. माजी केंद्रीय राज्यमंत्री तथा विद्यमान खासदार संजय धोत्रे यांचे ते पूत्र आहेत. भाजपच्या दुसऱ्या व महाराष्ट्रातील उमेदवारांच्या पहिल्याच यादीत अनुप धोत्रे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली.
भाजपने बुधवारी सायंकाळी वेगवेगळ्या राज्यातील ७२ उमेदवारांची घोषणा केली. यामध्ये महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील उमेदवारांच्या पहिल्याच यादीत अकोला लोकसभा मतदारसंघातून अनुप धोत्रे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजप पक्ष सुमारे वर्षभरापासून लोकसभा निवडणुकीच्या कामाला लागला आहे. अकोला लोकसभा मतदारसंघ भाजपचा गड म्हणून ओळखला जातो. भाजप, काँग्रेस व वंचित आघाडीत झालेल्या तिरंगी लढतीमध्ये भाजपला थेट लाभ झाल्याचा अकोल्याचा इतिहास आहे. २००४ पासून सलग चार लोकसभा निवडणुका जिंकून खासदार संजय धोत्रे यांनी अकोला मतदारसंघात निर्विवाद वर्चस्व राखले. प्रकृती अस्वास्थामुळे सध्या ते सक्रिय राजकारणापासून दूर आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला नवा उमेदवार रिंगणात उतरावा लागला.
हेही वाचा >>>‘लोकसत्ता’चा दणका : कर्तव्यात कसूर करणाऱ्या तीन डॉक्टरांची सेवासमाप्ती, जारावंडी लैंगिक अत्याचार प्रकरण
भाजपमध्ये उमेदवारीसाठी खासदार पूत्र अनुप धोत्रेंसह अर्धा डझन इच्छुकांची गर्दी होती. अकोला लोकसभा प्रमुख पदाची जबाबदारी अनुप धोत्रे यांच्यावर सोपवून पक्षाने त्यांना तयारीला लागण्याचे आदेश अगोदरच दिले होते. इच्छुकांकडून उमेदवारीसाठी प्रयत्न केले जात असतांना बुधवारी सायंकाळी आलेल्या भाजपच्या दुसऱ्या व महाराष्ट्रातील पहिल्या यादीमध्येच अनुप धोत्रे यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. गेल्या सलग चार लोकसभा निवडणुकीमध्ये खासदार संजय धोत्रे यांनी विजश्री खेचून आणल्यानंतर आता त्यांचे सुपूत्र अनुप यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली आहे.