घटना दुरुस्तीमुळे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावल्याप्रमाणे आणीबाणी पुन्हा लागू करणे शक्य नसलेतरी भारतासारख्या मोठय़ा लोकसंख्येच्या देशात अघोषित आणीबाणी केव्हाही येऊ शकते, असे मत श्याम पांढरीपांडे यांनी व्यक्त केले.
अभ्यंकरनगर नागरिक मंडळ आणि लोकतंत्र सेनानी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आपातकाल-एक चिंतन’ या विषयावर रविवारी बजाजनगरातील ज्ञानेश्वर मंदिरात चर्चा आयोजित करण्यात आली होती. इंदिरा गांधी यांनी आपले स्थान टिकवण्यासाठी आणीबाणी लावली होती. दैनंदिन, कौटुंबिक व्यवहारावर फारसा परिणाम झाला नव्हता. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला आणीबाणीचे सोयरसुतक नव्हते. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्यात आला होता. आणीबाणी उठल्यानंतर घटना दुरुस्ती करण्यात आली. त्यामुळे पुन्हा तशाप्रकारची आणीबाणी शक्य नाही. परंतु अघोषित आणीबाणी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे देशातील जनता, युवा पिढी त्याविषयी जागरूक असली पाहिजे. लोकशाही समृद्ध होण्यासाठी आणीबाणी का लावण्यात आली, त्याचे परिणाम काय झाले, याविषयीचे धडे देण्याची आवश्यकता आहे, असेही ते म्हणाले. आणीबाणी विरोधात पत्रकारांनी विविध क्लृत्या वापरून विरोध केल्याचे सांगून समाजवादी आणि सवरेदयवाद्यांचे आणीबाणी विरोधाला मोठे नैतिक पाठबळ होते, असे ज्येष्ठ पत्रकार लक्ष्मण जोशी म्हणाले.
देशात विविध पातळीवर आणीबाणीला विरोध होत होता. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनी पत्रकार परिषद घेऊन खुला विरोध केला होता. संमेलनात देखील आणीबाणी विरोधात ठराव घेण्यात आले.
जनता पार्टीचा विजय आणि काँग्रेसचा दारुण पराभव आणीबाणी काढून टाकण्यास कारणीभूत ठरला, असेही ते म्हणाले.
निर्भयता ही लोकशाही आणि नागरिकांचा आधार आहे. पण आणीबाणीच्या वातावरणात ती हरवते. भविष्यात अशी परिस्थिती उद्भवू नये. यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे, असे प्रा. योगानंद काळे म्हणाले. संचालन रवींद्र कासखेडीकर यांनी केले. यावेळी संजीव तारे यांच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले.