नागपूर : महाराष्ट्रातून गुजरात आणि इतर राज्यांत जाण्यासाठी दिवसभरात अनेक रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत. परंतु, राज्यातील प्रमुख शहरांदरम्यान धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या अत्यल्प आहे. त्याचा फटका विद्यार्थी, युवक, व्यावसायिकांना बसत आहे.

मुंबई, पुणे, नागपूर, नांदेड, औरंगाबाद हे शहर शिक्षण, व्यवसायासोबतच सांस्कृतिक, धार्मिकदृष्ट्याही महत्त्वाचे आहेत. मुंबई राज्याची राजधानी आहे तर नागपूर उपराजधानी. औरंगाबाद आणि नांदेड मराठावाड्यातील प्रमुख शहर आहेत. या शहरांचे राज्यातील इतर भागाशी जुळणे अपेक्षित आहे. परंतु, चित्र उलट आहे. महाराष्ट्राला देशातील इतर राज्यांशी जोडणाऱ्या भरपूर गाड्या आहेत. गुजरातमधील अहमदाबादसाठी तर मुंबईहून दिवसभरात तब्बल ३३ रेल्वेगाड्या आहेत. याउलट नागपूर उपेक्षितच आहे. नागपूरमार्गे देशाच्या सर्वच भागात रेल्वेगाड्या धावतात. मात्र, यापैकी अनेक रेल्वेगाड्यांना स्थानिक कोटा नाही किंवा त्यांच्या वेळा सोयीच्या नाहीत.

हेही वाचा – वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात बुकी मालामाल तर नवख्या सट्टेबाजांना जबर फटका; पोलिसांची करवाई मात्र शून्यच…

काही शहरांसाठी तर थेट रेल्वेगाडीच नाही. नागपूर ते छत्रपती संभाजीनगरदरम्यान गाडी नाही. मुंबई आणि नांदेड, औरंगाबादकरिता केवळ तीन गाड्या आहेत. नागपूर ते पुणे तसेच नागपूर ते मुंबईदरम्यान थेट गाड्यांची संख्यादेखील कमी आहे. पुण्यासाठी केवळ महाराष्ट्र एक्सप्रेस आहे. मुंबईकरिता नागपूरहून थेट धावणाऱ्या गाड्यांमध्ये सेवाग्राम एक्सप्रेस, दुरान्तो एक्सप्रेस, विदर्भ एक्सप्रेस आहे. याबाबत माहिती देताना भारतीय यात्री केंद्राचे अध्यक्ष बसंतकुमार शुक्ला म्हणाले, नागपूरहून पुणे, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नवी दिल्ली, बंगळुरू, लखनौसाठी थेट गाड्या सुरू करण्याची गरज आहे. नागपूर भौगोलिकदृष्ट्या मध्यभागी असल्याने येथून शेकडो गाड्या धावतात. पण, त्यांचा फारसा लाभ नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना होत नाही.

हेही वाचा – “नव्या योजनेची माहिती नाही अन् जुन्या योजनेचे पैसे मिळालेच नाही”, शासन आपल्या दारी कार्यक्रमातील उपस्थितांची व्यथा

नागपूर ते पुणेदरम्यान नवीन गाडी चालवणे शक्य नाही. त्यामुळे नियमित गाड्यांमध्ये अतिरिक्त डबे लावले आहेत. तसेच वेळोवेळी पुणे आणि मुंबईकरिता विशेष गाड्या चालवण्यात येत आहेत. – तुषारकांत पांडे, विभागीय व्यवस्थापक, मध्य रेल्वे.

Story img Loader