वर्धा : देवळी येथील राम मंदिर देवस्थान समितीच्या विश्वस्त मंडळीस अखेर उपरती झाली आहे. भाजपाचे जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांचा इशारा मर्मी बसला. यामुळे पोलीस बंदोबस्तही हटला असून सध्या देवळीत शांतता आहे. माजी खासदार रामदास तडस यांना मिळालेली ‘अस्पृश्य’ वागणूक देशभर गाजली. त्याचे तीव्र पडसाद उमटले आणि विश्वस्त लोटांगण घालते झाले.

नेमके प्रकरण काय?

रामनवमीस भाजपाचे माजी खासदार रामदास तडस हे पत्नी शोभाताईंसह या मंदिरात पूजा करण्यास पोहचले होते. पण सोवळं नाही, जानवे नाही म्हणून तुम्हास गाभाऱ्यात प्रवेश नाही, असे त्यांना सुनावण्यात आले होते. त्याच दिवशी भाजपाचा स्थापना दिन असल्याने चांगली सुरुवात व्हावी म्हणून मंदिरात गेलेल्या रामदास तडस यांना अपमानीत होत माघारी फिरावे लागले. ही बाब सामान्य रामभक्तांच्या जिव्हारी लागली होती.

आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा

‘लोकसत्ता’ने हे प्रकरण उजेडात आणताच देशभरच नव्हे तर जगभर असलेल्या ‘लोकसत्ता ऑनलाइन’ वाचकांनी निषेध नोंदवला. स्वत: रामदास तडस यांनी ‘लोकसत्ता’ने एका वैचारिक भूमिकेस वाचा फोडली, याबद्दल समाधान व्यक्त केले. लगेच भाजपा जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांनी रामदास तडस यांना अवमानीत केले याचा जाहीर निषेध नोंदवला. माफी मागा, अन्यथा मी राम मंदिरापुढे आत्मक्लेश आंदोलन करणार, असा इशारा त्यांनी दिला.

मंदिर विश्वस्तांकडून माफी

देश-विदेशातून टीकेचा भडीमार होत असल्याने या राम मंदिराभोवती पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. तणाव पाहून राम मंदिर विश्वस्त समितीने बैठक घेतली. स्थानिक भाजपा नेते राहुल चोप्रा यांना बोलावून समितीने आम्ही भेटून माफी मागतो, असा निरोप देण्यास सांगितले.

सायंकाळी रामदास तडस स्टेडियम येथे तडस यांना परत पाठवणारे पुजारी, देवस्थान समिती अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य, विश्वस्त व मुख्य पुजारी मुकुंद चौरीकर व अन्य हजर झाले. आमचे चुकले, असे विश्वस्तांनी आरंभीच कबूल केले. आम्ही भक्तमंडळी व रामदास तडस यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्याबद्दल माफ करावे, अशी विनंती आहे. असे पुढे होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केल्याचे रामदास तडस यांच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.

रामदास तडस काय म्हणाले?

रामदास तडस म्हणतात की, विश्वस्त मंडळींनी जो अनुभव मला रामनवमीस दिला तो मनस्ताप देऊन गेला. माझा दिवस खराब गेला. आज मंदिर ट्रस्टी स्वतः आले. माझी व कुटुंबाची माफी मागितली. आता मनात राग नाही. माफ करणे ही हिंदू संस्कृती आहे. मी त्याचे पालन केले. दुसरीकडे, स्थानिक भाजपा आमदार राजेश बकाने यांनी या समितीच्या सर्व व्यवहराची शासकीय चौकशी करण्याची मागणी रेटून धरली आहे.