गडचिरोली : नक्षलवादी संघटनेच्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त २१ सप्टेंबरपासून सप्ताहाला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम धोडराज ठाण्याच्या हद्दीतील हिंदेवाडा येथे मुख्य रस्त्यावर नक्षलवाद्यांनी लाल रंगाचे फलक लावून हिंदुत्वववादी विचारसरणीविरुद्ध जनयुद्ध उभारण्याचे आव्हान केले आहे. दरम्यान, पोलिसांनी हे पोस्टर काढले असून तपास सुरु केला आहे.
नक्षलवादी संघटनेच्या १९ वा वर्धापनदिनानिमित्त केंद्रीय समितीने ऑगस्टमध्ये २८ पानांचे पत्रक काढून थेट भाजपला इशारा दिला होता. वर्धापनदिनानिमित्त २१ ते २७ सप्टेंबर २०२३ दरम्यान सप्ताह साजरा करण्याचे आवाहन केले होते. दरम्यान, सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी २१ सप्टेंबरला भामरागड तालुक्यातील हिंदेवाडा फाट्यावरील रस्त्यावर दोन झाडांना नक्षल्यांनी फलक लावले. त्यात संघटनेच्या वर्धापनदिनानिमित्त नक्षल सप्ताह उत्साहात व दृढ संकल्पासह साजरा करण्याचे आवाहन केले आहे.
हेही वाचा – सरकारी शाळांचे कंपनीकरण थांबवा; प्राथमिक शिक्षक समितीने दर्शविला विरोध
ब्राम्हणीय हिंदुत्ववादाविरुद्ध लढा देण्यासाठी व्यापक जनयुद्धाची हाक दिली आहे. संघटना अधिक मजबूत करण्याचे आवाहनदेखील करण्यात आले आहे. यात केंद्रीय कमिटी भारत की कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) असा उल्लेख आहे. दरम्यान, परिसरात खळबळ उडाली. माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत फलक ताब्यात घेतले आहे.
‘सी – ६०’चे जवान तळ ठोकून
धोडराज हद्दीतील हिंदेवाडा फाटा रस्त्यावर नक्षल फलक आढळले आहे. ते ताब्यात घेतले असून तपास सुरू केला आहे. नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे. त्या भागात पोलीस अधिक अलर्ट आहेत, सी- ६० चे जवान तळ ठोकून आहेत, अशी माहिती गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली.