एलकुंचवार यांचे साहित्यिकांना आवाहन; संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांचा सत्कार

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला लेखकांनी स्वखर्चाने जावे. अनावश्यक टाळावा, असे आवाहन ज्येष्ठ नाटकककार महेश एलकुंचवार यांनी केले. ‘आधार’ संस्थेच्यावतीने आज शुक्रवारी नवनियुक्त संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी ते बोलत होते.

सायंटिफिक सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ कादंबरीकार आशा बगे, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष गिरीश गांधी, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, आधारचे डॉ. अविनाश रोडे, हेमंत काळीकर उपस्थित होते. यावेळी एलकुंचवार यांनी साहित्य संमेलनाची निवडणूक टाळून अध्यक्ष नेमण्याच्या पद्धतीचे स्वागत केले. त्याचवेळी संमेलनासाठी अवाढव्य खर्च टाळून लेखकांच्या पडत्या काळात मदत करण्यासाठी निधी उभारण्याचे आवाहनही केले. अरुणा फक्त कवयित्री नाही तर संशोधक, लोकवाङ्मयाची अभ्यासकही आहे. तिचे वडील अण्णा पितृतुल्य होते.  त्यांचे सर्व लेखन लालित्यपूर्ण आहे. खूप प्रकारचे लेखन अरुणाने केले आहे. तिच्या लेखनातील स्त्री नागर आहे. तिच्या स्त्री व्यक्तीरेखा बुचकळ्यात टाकतात. अरुणा चांगल्या प्रवासाला निघाली आहे. अरुणाला वडिलांच्या नावाने  प्रतिष्ठान उभारायचे आहे, त्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन त्यांनी केले.

आशा बगे म्हणाल्या, मोती सापडण्याच्या वाटेने अरुणा जात आहे. अरुणाला माहेरी व्यासंगी वडिलांचा श्रीमंत वारसा लाभला आहे. जुन्या पुस्तकांचा गंध घेत अरुणा मोठी झाली. रा.चिं. ढेरेंना अनेक वर्षांपासून वाचत आहे. अरुणाने ते वैभव जपले आणि कवितांमध्ये गुणात्मक  भर घातली, असेही त्यांनी सांगितले. गिरीश गांधी म्हणाले,  दुर्गा भागवत, इरावती कर्वे यांना अपेक्षित स्त्रीची भूमिका अरुणाताई पेलत आहेत. सत्काराला उत्तर देताना अरुणा ढेरे म्हणाल्या, माहेरचे  कौतुक, निखळ, अकृत्रिम प्रेम नागपूरकरांकडून मिळाले. आयुष्य असेच घडत असते. संमेलनाचे अध्यक्षपद अनपेक्षितपणे आले. मुळात हा सन्मान नाही तर जबाबदारी आहे. एलकुंचवार यांच्याप्रमाणेच गरजू लेखक उत्तम तुपे किंवा इतरही लेखकांना मदत करण्याचा पुनरुच्चार त्यांनी केला. खूप मोठे संचित वारसाहक्काने मिळाले. भौतिक आयुष्याचा वडिलांनी विचारच केला नाही. त्यांचे पुस्तकरूपी धन संशोधक, जिज्ञासू, अभ्यासकांसाठी खुला करण्याच्या उद्देशाने एक प्रतिष्ठान उभारण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली.

Story img Loader