लोकसत्ता टीम
नागपूर: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केंद्रशासनाच्या सेवांमधे नव्याने भरती झालेल्या ७० हजार तरुणांना देशातील ४३ ठिकाणी दूरदृश्यप्रणालीद्वारे मंगळवारी नियुक्तीपत्रे दिली गेली. नागपुरातील वनामती केंद्रावर आधीच रूजू झालेल्या काही उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिल्याचे पुढे येत आहे. त्यामुळे आधी रूजू झाले, त्यांना आता नियुक्तीपत्र कशाला? या प्रश्नावर नागरिकांमध्ये चांगली चर्चा रंगली आहे.
शहरात गडकरी यांच्या हस्ते पाच जणांना नियुक्तीपत्रे दिली गेली. याप्रसंगी मंचावर वित्त खात्याचे अपर सचिव ग्यानतोष रॉय, बँक ऑफ महाराष्ट्रचे महाव्यवस्थापक विजय कांबळे, विभागीय व्यवस्थापक वैभव काळे उपस्थित होते. नागपुरातील रोजगार मेळाव्यात केंद्राच्या अखत्यारित असलेल्या विविध बँक, व्हीएनआयटी, रेल्वेत सेवेवर लागलेल्या २३९ उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली गेली.
आणखी वाचा-नागपूर: धक्कादायक! मुलीच्या अन्ननलिकेत अडकली जांभळाची बी
नियुक्तीपत्रे दिलेल्यांपैकी काहींची सेवा आधीच म्हणजे सुमारे एक ते दोन महिन्यापूर्वीच सुरू झाली आहे. वनामतीमध्ये नियुक्तीपत्र मिळालेल्या विनोद (बदललेले नाव) या युवकाशी संवाद साधला असता त्याने गेल्या महिन्यातच एका बँकेत सेवा सुरू केल्याचे सांगितले. तो बऱ्याच वर्षांपासून रोजगाराच्या प्रतीक्षेत होता. एका बँकेतच चांगल्या पदावर सुमारे महिन्याभरापूर्वी रूजू झालेल्या ललिता (बदललेले नाव)ने सांगितले, ती गेल्या पाच-सहा वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होती. नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य शासनात सेवा सुरू केलेल्या बबन (बदललेले नाव) या युवकाने केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या संस्थेत नोकरीची संधी मिळाल्याने जुनी सेवा सोडली. केंद्रीय संस्थेत जास्त वेतन व सोयी मिळाल्याने त्याने येथे सेवा सुरू करणार असल्याचे सांगितले. दरम्यान, बऱ्याच उमेदवारांची निवड आधीच झाली होती, परंतु रोजगार मेळाव्याच्या निमित्ताने त्यांची नियुक्तीपत्रे रोखली का, हा प्रश्नही या क्षेत्रातील जाणकार उपस्थित करत आहेत.
एम्समध्ये दोन नियुक्ती
‘एम्स’मध्ये अस्थीरोग विभागाचे सहयोगी प्राध्यापक म्हणून डॉ. समीर द्विमुठे यांनी आधीच सेवा सुरू केली आहे. त्यांनी प्राध्यापक पदाची परीक्षा उत्तीर्ण केली. त्यामुळे त्यांना प्राध्यापक पदाचे नियुक्तीपत्र कार्यक्रमात दिले गेले. तर डॉ. अमृता लाडके यांनाही सहयोगी प्राध्यापक म्हणून येथे नियुक्तीपत्र दिले गेले.
नागपुरात वितरित नियुक्तीपत्रांची स्थिती
संस्थेचे नाव- उमेदवार
बँक ऑफ महाराष्ट्र- १६
युनियन बँक ऑफ इंडिया- ३३
पंजाब नॅशनल बँक- ०४
बँक ऑफ इंडिया- ०७
सेंट्रल बँक ऑफ इंडिया- ०३
स्टेट बँक ऑफ इंडिया- ०३
विदर्भ कोंकण ग्रामीण बँक- ०५
इंडियन ओव्हरसिज बँक- ०५
एम्स, नागपूर- ०२
पोस्ट विभाग- १०
आयकर विभाग- ०२
एसआयडीबीआय- ०५
कॅनरा बँक- २३
यूको बँक- ०४
व्हीएनआयटी- ५९
सेंट्रल रेल्वे- ५६
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग- ०१