अनिल कांबळे, लोकसत्ता
नागपूर : कारागृह विभागातील अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कार्यालयात अतिरिक्त जेलरक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. त्या जेलरक्षकांकडून वरिष्ठ अधिकारी चक्क घरातील कामे करून घेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य कारागृह विभागात आणखी ५ हजार कारागृहरक्षकांची गरज आहे. प्रत्येक कारागृहात कर्मचाऱ्यांची बरीच पदे रिक्त आहेत. कारागृहातील कायदा व सुरक्षा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जेलरक्षकांची नियुक्ती केली जाते. मात्र, त्याच्या उलट अतिरिक्त पोलीस महासंचालक, कारागृह उपमहानिरीक्षक आणि कारागृह अधीक्षकांच्या कार्यालयात ८ ते २२ जेलरक्षकांनी नियुक्ती करण्यात येत आहे. दुसरीकडे कारागृहात सुरक्षाव्यवस्थेसाठी कर्मचारी नसल्यामुळे कैद्यांमध्ये हाणामारीच्या घटना रोज घडत आहेत. कार्यालयात नियुक्त असलेल्या जेलरक्षकांना वरिष्ठ अधिकारी घरकामात गुंतवून ठेवतात. बाजारात जाणे, घराची साफसफाई करणे, मुलांचा सांभाळ करणे, किराणा आणायला लावणे आणि धुणीभांडी करण्याचे काम करण्यास त्यांना भाग पाडतात, अशी माहिती आहे. नागपूर ‘डीआयजी’ कार्यालयात ६ तर औरंगाबाद कार्यालयात ७ , मुंबईमध्ये ८ तसेच भायखेडा, येरवडा, पुणे मुख्यालय कार्यालयातही जेलरक्षकांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
इतर कर्मचाऱ्यांत भेदभावाची भावना
जेलरक्षक पदावर भरती झाल्यानंतर काही कर्मचाऱ्यांना ‘साहेबांचा घरगडी’ म्हणून कार्यालयात तैनात करण्यात येते. वरिष्ठांच्या कार्यालयात असल्यामुळे त्यांची पोलीस महासंचालक पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि अन्य पदकांसाठी शिफारस केली जाते. त्यांना शनिवार-रविवार अशी दोन दिवस नियम वगळून सुटी दिली जाते. अन्य कर्मचाऱ्यांना हक्काच्याही रजा मिळत नाहीत. त्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांमध्ये भेदभावाची भावना निर्माण होत असल्याची चर्चा आहे.
‘अतिरिक्त म्हणता येणार नाही..’
काही पदे आम्ही कारागृहातून उपमहानिरीक्षक कार्यालयात वर्ग करतो. दक्षता पथकात काही कर्मचारी नियुक्त असतात. वाहनचालक, अंगरक्षक अशा पदांवरही जेलरक्षक काम करतात. त्यामुळे ‘डीआयजी’ कार्यालयात अतिरिक्त कर्मचारी आहेत, असे म्हणता येणार नाही, अशी प्रतिक्रिया पोलीस उपमहानिरीक्षक कार्यालय, पुणे येथून मिळाली.