नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी संचालक असलेल्या महात्मा शुगर ॲण्ड पाॅवर लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक नितीन मुधोळकर यांची पत्नी तृप्ती मुधोळकर यांची महापारेषणच्या संचालक (वित्त) पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तृप्ती मुधोळकर या फेब्रुवारी २०२४ मध्ये महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्पातून मुख्य महाव्यवस्थापक (वित्त) पदावरून सेवानिवृत्त झाल्या. त्यांनी यापूर्वी महापारेषणमध्ये संचालक वित्त तज्ज्ञ म्हणूनही जबाबदारी सांभाळली आहे. त्या नागपुरातील असून त्यांनी येथील जी. एस. काॅलेज व त्यानंतर देशातील नावाजलेल्या इतर संस्थेतून शिक्षण घेतले. त्यांचे पती नितीन मुधोळकर हे गडकरी यांचे पुत्र सारंग गडकरी संचालक असलेल्या महात्मा शुगर ॲण्ड पाॅवर लिमिटेड या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. या कंपनीच्या संकेतस्थळावरील संचालकांच्या यादीत सारंग गडकरी या कंपनीत २४ ऑगस्ट २००९ पासून संचालक असल्याचे तर नितीन मुधोळकर हे ५ जुलै २०११ पासून व्यवस्थापकीय संचालक असल्याचे दर्शवले आहे. दिलीप धोटे, अनिल जोशी, वसंत खंडेलवाल, भूपेंद्र शहाणे यांचेही संचालक म्हणून नाव आहे. तृप्ती मुधोळकर यांच्या नियुक्तीबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
“तृप्ती मुधोळकर या महानिर्मिती कंपनीत यापूर्वी कार्यरत होत्या. मला त्यांच्याबद्दल एवढेच माहिती आहे. त्याशिवाय मला काहीही कल्पना नाही.” – विश्वास पाठक, स्वतंत्र संचालक, एम. एस. ई. बी. होल्डिंग कंपनी लिमिटेड.
महानिर्मिती कंपनीबाबत..
महानिर्मिती ही महाराष्ट्र शासनाची वीज निर्माण करणारी कंपनी आहे. कंपनीची स्थापित क्षमता १३ हजार १५२.०६ मेगावाॅट आहे. यामध्ये औष्णिक विद्युत (जवळपास ७५%, म्हणजेच ९५४० मेगावॅट) आणि उरण येथील वायू आधारित निर्मिती केंद्रांचा समावेश आहे, ज्याची स्थापित क्षमता ६७२ मेगावॅट आहे. शासनाच्या जलसंपदा विभागाने (डब्ल्यू.आर.डी.) जलविद्यूत प्रकल्प संचालन आणि देखभालीसाठी महानिर्मितीला दीर्घकालीन भाडेपट्टीवर दिले आहे. सध्या २५ जलप्रकल्प आहेत, त्यांची क्षमता २५८० मेगावॅट आहे.
महानिर्मितीचे संचालक मंडळ
महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन आहेत. संचालक मंडळात अति. मुख्य सचिव (ऊर्जा), महाराष्ट्र शासन आभा शुक्ला, संचालक (संचलन) एस.एम. मारुडकर, संचालक व सल्लागार (खनिकर्म) – प्रभारी डॉ. धनंजय सावळकर, संचालक (वित्त) बाळासाहेब थिटे, संचालक (प्रकल्प) अभय हरणे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक असल्याचे महानिर्मितीच्या संकेतस्थळावर दर्शवले आहे.