अमरावती : शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या समर्थकांनी शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी हालचाली सुरू केल्या असतानाच शिवसेनेने अमरावती जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून पडझड रोखण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. नवीन नियुक्त्यांमध्ये काही पदाधिकाऱ्यांना बढती देण्यात आली आहे, तर काही पदाधिकाऱ्यांवर नवीन जबाबदारी सोपवली आहे.
शिवसेनेने दिनेश बूब यांच्यासह तीन जणांची सहसंपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. दिनेश बूब हे तिवसा, अचलपूर आणि मेळघाट विधानसभा क्षेत्राचे सहसंपर्क प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत, तर गजानन वाकोडे यांच्यावर अमरावती, बडनेरा आणि दर्यापूर तसेच बाळासाहेब भागवत यांच्याकडे धामणगाव रेल्वे आणि मोर्शी विधानसभा क्षेत्राची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
माजी आमदार ज्ञानेश्वर धाने पाटील, नाना नागमोते, किशोर माहुरे हे जिल्हा समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. धाने पाटील यांच्याकडे तिवसा, अचलपूर आणि मेळघाट विधानसभा मतदारसंघाची, नाना नागमोते यांच्याकडे अमरावती, बडनेरा आणि दर्यापूर, तसेच किशोर माहुरे यांच्याकडे तिवसा, अचलपूर आणि मेळघाट मतदार संघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सुनील खराटे, राजेश वानखडे यांना जिल्हाप्रमुखपदी कायम ठेवण्यात आले आहे. याशिवाय मनोज कडू यांची नव्याने जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील खराटे हे अमरावती, बडनेरा आणि दर्यापूर, राजेश वानखडे हे तिवसा, अचलपूर आणि मेळघाट तर मनोज कडू हे धामणगाव रेल्वे आणि मोर्शी विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी सांभाळतील. पराग गुडधे यांना महानगर प्रमुख म्हणून कायम ठेवण्यात आले आहे.
शिंदे गटातील नेते शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात असून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे समर्थक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.