अकोला : शैक्षणिक सत्र २०२३-२४ मध्ये औषध निर्माणशास्त्र पदविका अभ्यासक्रमाच्या नवीन ३१ महाविद्यालयांना राज्य शासनाने मान्यता दिली. या महाविद्यालयांमध्ये एक हजार ८६० जागा वाढल्या आहेत.यात पश्चिम विदर्भातील तीन महाविद्यालयांचा समावेश आहे. डी.फार्म अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा कल असून त्या पार्श्वभूमीवर जागा वाढविण्याची मागणी करण्यात आली होती. आता त्याला मंजुरी मिळाल्याने प्रवेशोत्सुक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
औषध निर्माणशास्त्र पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया (पीसीआय) ही सर्वोच्च संस्था आहे या संस्थेने शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी पदवी व पदविका अभ्यासक्रमाच्या नवीन महाविद्यालयांना मान्यता देण्यासाठी इच्छूक संस्थांकडून प्रस्ताव मागविले होते. संबंधित संस्थांची तपासणी केल्यानंतर पीसीआयने राज्यात ३१ नवीन महाविद्यालयांना मान्यता दिली. त्याच आधारे राज्य शासनानेही शासन निर्णय जारी करून या नवीन ३१ महाविद्यालयानां शैक्षणिक सत्र २०२३-२४ पासून मान्यता प्रदान केली आहे.
हेही वाचा >>>खापरखेडा वीज केंद्राचा राख बंधारा फुटल्याने पर्यावरणवादी संतप्त, शेतकरी संकटात
पश्चिम विदर्भात तीन नवीन महाविद्यालय होणार आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात आमदार धिरज लिंगाडे, माजी आमदार कृष्णराव इंगळे यांच्या शिक्षण संस्थांना तर अकोल्यात डॉ. सुधीर ढोणे यांच्या शिक्षण संस्थेला नवीन महाविद्यालय मंजूर करण्यात आले आहे.
हेही वाचा >>>राज्यात २२ ते २४ जुलै दरम्यान अतिवृष्टीची शक्यता
१८ जिल्ह्यांमध्ये नवीन महाविद्यालय
औषध निर्माणशास्त्र अभ्यासक्रमाच्या नवीन महाविद्यालयांमध्ये नागपूर व अहमदनगर जिल्ह्यात प्रत्येकी चार, जळगांव व नाशिक जिल्ह्यात प्रत्येकी तीन, धुळे, बुलढाणा व ठाणे जिल्ह्यात प्रत्येकी दोन, तर कोल्हापूर, वर्धा, सिंधुदूर्ग, पालघर, चंद्रपूर, जालना, लातुर, पुणे, अकोला, भंडारा व गडचिरोली जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा ३१ नवीन डी-फार्म महाविद्यालयांना मान्यता मिळाली आहे.