नवीन परिचर्या महाविद्यालयासाठी शासनाने ठरवलेले निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. परंतु, बनावट कागदपत्राद्वारे अनेक नवीन महाविद्यालये मिळवली जात असून भंडारा जिल्ह्यातील एका महाविद्यालयाला मंजुरी मिळाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद येरणे यांनी केला. बुधवारी नागपुरातील प्रेस क्लबमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी माहितीच्या अधिकारातील कागदपत्रेही सादर केली.
डॉ. मिलिंद येरणे म्हणाले, परिचारिका महाविद्यालयासाठी १०० खाटांचे रुग्णालय असावे लागते. त्याबाबत ग्रामीण भागात जिल्हा आरोग्य अधिकारी तर शहरी भागात जिल्हा शल्यचिकित्सकाचे प्रमाणपत्र लागते. परंतु, भंडारातील कोसरा (कोंढा) येथे स्व. लक्ष्मणराव मोटघरे चॅरिटेबल ट्रस्ट, कोसराला १०० खाटांचे रुग्णालय नसतानाही हे महाविद्यालय मंजूर झाले. दरम्यान, माहितीच्या अधिकारात याच्याशी संबंधित जिल्हा शल्यचिकित्सकांनी या रुग्णालयाला १०० खाटांची परवानगीच नसल्याचे स्पष्ट केले.
हेही वाचा >>> उद्योजक घडविण्यासाठी ‘बार्टी’चे पाऊल ; शासकीय योजनांचे लवकरच ‘बेंच मार्क सर्वेक्षण’
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडूनही या संस्थेसाठी परवानगी लागते. परंतु, मंडळाने माहितीच्या अधिकारात येरणे यांना या विभागाकडे या संस्थेबाबत कोणतीही नोंद नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे प्रदूषण मंडळाचेही बनावटी कागदपत्र महाविद्यालय मिळवण्यासाठी जोडल्याचा दावा येरणे यांनी केला. हे महाविद्यालय डॉ. एकनाथ नाफडे यांच्या रुग्णालयाशी संलग्नित दाखवले गेले. प्रत्यक्षात डॉ. नाफडे यांनी अड्याळ पोलिसांकडे संबंधित संस्थेशी व व्यक्तीशी काहीही संबंध नसताना त्यांचे नाव बेकायदेशीर जोडल्याची तक्रार केली आहे. दरम्यान, भंडाऱ्यात ४ तर राज्यातील इतरही भागात बऱ्याच परिचारिका महाविद्यालयांना मंजुरी मिळाली आहे. मात्र, हे प्रकरण बघता राज्यात अनेक महाविद्यालयांना बनावट कागदपत्रावरून मंजुरी मिळाल्याची शंकाही डॉ. येरणे यांनी वर्तवली. या विषयावर वारंवार अरूण मोटघरे आणि सुजाता मोटघरे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.
संबंधित पोलीस ठाण्यातून या पद्धतीची तक्रार आल्यानंतर त्यांना रितसर उत्तर पाठवण्यात आले आहे. महाराष्ट्र सुश्रूषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळाकडून नियमानुसारच सगळी प्रक्रिया केली जाते. पत्रकार म्हणून आपणही विभागाला रितसर पत्र दिल्यास आपल्याला आवश्यक उत्तर दिले जाईल, असे महाराष्ट्र राज्य सुश्रुषा व पॅरावैद्यक शिक्षण मंडळ, मुंबईच्या प्रबंधक छाया लाड म्हणाल्या.