नागपूर : गेल्या दहा वर्षांत देशात काय कामे झालीत, सर्वांना माहीत आहे. जगभरात १ एप्रिल हा दिवस ‘एप्रिल फुल डे’ म्हणून साजरा झाला, मात्र आपल्याकडे हा दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा केला गेला, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी केली.
यवतमाळ दौऱ्यावर जाण्यापूर्वी आदित्य ठाकरे नागपुरात आले असता ते बोलत होते. गेल्या दहा वर्षांत ‘अच्छे दिन’च्या केवळ घोषणा करण्यात आल्या. जनतेची केली जात असलेली दिशाभूल पाहता १ एप्रिल हा दिवस ‘अच्छे दिन’ म्हणून साजरा करतो आहे, अशी टीका ठाकरे यांनी केली.
हेही वाचा – राष्ट्रवादी २५ वर्षांनंतर पुन्हा वर्ध्याच्या रिंगणात
यवतमाळमध्ये संजय देशमुख यांचा नामांकन अर्ज भरण्यासाठी जात असून त्यानिमित्त महायुतीची सभा होणार आहे. महाविकास आघाडीने यवतमाळला उमेदवार दिला आहे मात्र अजूनही महायुतीने उमेदवार दिला नाही. आता ते भ्रष्ट उमेदवार देणार आहे की नवीन चेहरा देणार आहे हा प्रश्न आहे, असेही ठाकरे म्हणाले.
बंडखोर आणि गद्दारीमध्ये फरक आहे. तुमाने यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता शिंदेंच्या ४० गद्दारांनीही समोरचा विचार केला पाहिजे. जिथे-जिथे गद्दारांना तिकीट मिळाली आहे तिथे त्यांचा पराभव होणार आहे. देशभरात परिवर्तनाचे वारे वाहू लागलेले आहेत. दिल्ली, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल येथे इंडिया आघाडीची बांधणी मजबूत असल्याचे दिसून येत आहे, असेही ठाकरे म्हणाले.
देशात लोकशाही संपत चाललेली आहे. संविधानाला मोठा धोका आहे. अशा काळात आम्ही सगळे एकत्र येऊन लोकशाही वाचण्यासाठी लढत आहोत, असे ठाकरे म्हणाले. उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सर्वच लोकांना सोबत घेऊन चालत आहेत. आमच्या सोबत आहे तेच खरे शिवसैनिक आहे, असेही ठाकरे म्हणाले.