अमरावती : विश्वचषक तिरंदाजीच्या स्टेज-१ आणि २ साठी वरिष्ठ भारतीय संघात याआधीच स्थान मिळवणाऱ्या अमरावतीची तिरंदाज मधुरा धामणगावकरने भुवनेश्वर येथे झालेल्या निवड चाचणीत २९ स्पर्धकांमध्ये अव्वल स्थान पटकावत जागतिक विद्यापीठ खेळांसाठी भारतीय संघात स्थान पक्के केले आहे.तिच्या या कामगिरीमुळे धनुर्विद्या क्षेत्रात अमरावतीचे नाव पुन्हा एकदा चकाकले आहे. २५ आणि २६ मार्च रोजी भुवनेश्वर येथील केआयआयटी विद्यापीठात निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. या निवड चाचणीद्वारे जागतिक पातळीवरील विद्यापीठ स्तरीय स्पर्धेसाठी स्पर्धकांची निवड करण्यात आली.

एकूण १४०३ गुणांसह २९ स्पर्धकांमध्ये अव्वल ठरलेली मधुरा २२ ते २६ जुलै २०२५ या कालावधीत जर्मनीतील एसेन येथे होणाऱ्या जागतिक विद्यापीठ खेळांमध्ये भारतीय महिला संघाचे प्रतिनिधित्व करेल.कर्मवीर भाऊसाहेब पाटील विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारी मधुरा, सातारा येथील दृष्टी तिरंदाजी अकादमीची नियमित सदस्य आहे. जिथे ती कंपाऊंड तिरंदाजीचे भारतीय प्रशिक्षक प्रवीण सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.मधुरा व्यतिरिक्त, सातारा येथील साहिल जाधव, जो दृष्टी अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी आहे, त्याने देखील जागतिक विद्यापीठ खेळांसाठी पुरुषांच्या भारतीय संघात स्थान मिळवले आहे. मधुरा हिने सुरुवातीला गणेश विश्वकर्मा आणि पवन तांबट यांच्याकडून प्रशिक्षण घेतले होते. नंतर ती प्रवीण सावंत यांच्या दृष्टी तिरंदाजी अकादमीमध्ये सहभागी झाली. कंपाऊंड धनुर्विद्यामधील तिचे कौशल्य आणखी वाढवू लागली. या वर्षी एप्रिल आणि मे मध्ये होणाऱ्या स्टेज १ आणि २ तिरंदाजी विश्वचषकासाठी तिने वरिष्ठ भारतीय संघात स्थान पक्के केल्याने तिचा आत्मविश्वास दुणावला आहे. 

झारखंडमध्ये नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय खेळांमध्येही तिने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते जिथे तिने सांघिक सुवर्णपदक जिंकले होते. धनुर्विद्या क्षेत्रात  अमरावतीचे नाव देशपातळीवर घेतले जाते. अनेक तिरंदाजांनी आपल्या कामगिरीने देशपातळीवर आपला ठसा उमटवला आहे. मधुरा हिचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्र तिरंदाजी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत देशपांडे आणि सचिव प्रमोद चांदूरकर यांनी दोन्ही तिरंदाजांची जागतिक विद्यापीठ क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी भारतीय संघात सर्व स्पर्धकांमध्ये प्रथम क्रमांकासह निवड झाल्याने मला खरोखर आनंद झाला आहे. जुलैमध्ये होणाऱ्या गेम्सपर्यंत हा वेग कायम ठेवण्यासाठी आणि सुवर्णपदकासह घरी परतण्यासाठी मी उत्सुक आहे’, असे मधुराने सांगितले.