गोंदिया : गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा. संपूर्ण पीक वरथेंबी पाण्यावर अवलंबून. रोहिणी नक्षत्रापाठोपाठ मृगही कोरडाच जात असल्यामुळे वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नानाविध प्रयत्न करण्यात आले. त्याचाच परिणाम की काय २२ जूनला आर्द्रा नक्षत्रास सुरुवात होताच गुरुवारी सायंकाळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात दमदार पावसाचे आगमन झाले. त्यामुळे शेतकरी सुखावला असून पेरणीच्या कामाला वेग येणार आहे.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला, उन्हाची दाहकता कमी झाल्यामुळे नागरिक सुखावला आहे. आज शुक्रवारीपण सकाळच्या सुमारास ६ ते ७ वाजेपर्यंत पाऊस पडला. खरीप हंगाम २०२० आणि २०२१ मध्ये पर्जन्यवृष्टी आणि धान पिकांवर रोग आणि किडीच्या प्रादुर्भावामुळे मागील २ वर्षांपासून जिल्ह्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती तसेच भरीस भर म्हणून कोविड- १९ या संसर्गजन्य विषाणूच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला जीवन यापण करणे कठीण झाले होते.
हेही वाचा – प्लास्टिकचे आक्रमण कायमच, बंदीचा उडाला फज्जा! बंदीच्या निर्णयाला पाच वर्ष पूर्ण
खरीप २०२२ मध्ये धान परिपक्व झाल्यावर धानावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादन कमी झाले होते. तरीही खरीप हंगाम २०२३ ची चाहूल लागताच शेतकरी मागील सर्व विसरून यावर्षी चांगले पीक पाणी येईल. या आशेने पेरणीपूर्व मशागतीच्या कामास लागला. नंतर रोहिणीसह मृग नक्षत्रही कोरडाच गेला. त्यामुळे धान उत्पादक पेरणीकरिता पावसाची चातकासारखी वाट पाहत होता. वरुणराजा बरसावा यासाठी अनेक गावांत नानाविध उपाययोजना करण्यात आल्या. अखेरीस आर्द्रा नक्षत्राची सुरुवात होताच गुरुवारी जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावल्यामुळे धान उत्पादक शेतकरी सुखावला आहे. तसेच वातावरणात आद्रता निर्माण झाल्याने उकाड्यापासून सध्या तरी सुटका झाली आहे. वाऱ्यामुळे काही काळ वीजपुरवठा बंद झाला होता. पावसात सातत्य कायम राहिल्यास कोरडवाहू शेतकरी पेरणीस सुरुवात करणार असल्याचे जिल्ह्यात चित्र दिसत आहे.