भंडारा : तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना २१ एप्रिलपासून सुटी देण्यासंदर्भात शासन परिपत्रक काढण्यात आले. मात्र, यात जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवण्याबाबत स्पष्ट निर्देश असून इतर मंडळाच्या शाळांना सोयीस्करपणे शाळा सुरू ठेवण्यासाठी सवलत देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनाच उष्माघाताचा धोका आहे का ? इतर मंडळाच्या विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका नाही का ? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला आहे. शासनाचा हा निर्णय दुटप्पीपणा असल्याचा आरोप आता सर्व स्तरातून होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जिल्ह्यातील जिल्हा परिषद वगळता इतर मंडळाच्या सर्व शाळा अजूनही सुरूच आहेत. समर कॅम्पच्या नावावरही शाळा सुरू आहेतच. या शाळांना भरउन्हात दुपारी १ ते २ वाजतादरम्यान सुट्टी होते. त्यामुळे या शाळांमधे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना उष्माघाताचा धोका नाही का ? असा प्रश्न पालकवर्गातून उपस्थित होत आहे. मुळात सुट्टी संदर्भातील शासन परिपत्रकात मुद्दा क्रमांक २ नुसार “इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने त्यांच्या स्तरावर उचित निर्णय घ्यावा,” असे नमूद करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून या शाळांमध्ये असे कोणते महत्त्वाचे शैक्षणिक उपक्रम सुरू आहेत? या शाळांमध्ये पालक – शिक्षक रीतसर संघटनेची स्थापना झाली आहे का? शाळा सुरू ठेवण्यासंदर्भात पालकांची भूमिका विचारात घेण्यात आली आहे का ? फक्त जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांनाच उष्माघात होऊ शकतो का ? सुरू असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्याना काहीही कमीजास्त झाले तर त्याला जबाबदार कोण? असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.

हेही वाचा – यवतमाळ : कुमारी मातेची फरफट; नोकरीचे आमीष दाखवून दीड लाखांत विक्री, मध्यप्रदेशात अत्याचार

यासंदर्भात शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डोर्लीकर यांना विचारणा केली असता, शासन परिपत्रकात नमूद असल्यामुळे इतर मंडळाच्या शाळा सुरू राहतील, असे सांगितले.

करोना काळात किंवा पूर परिस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासन तसेच शिक्षणाधिकारी शाळा बंद करण्यासंदर्भात निर्णय घेतात. मात्र, उष्माघतासारख्या मुद्यावर जिल्हा प्रशासनाने शाळावर जबाबदारी ढकलून हात वर केले आहे. उन्हाळा सुरू झाल्याने राज्याच्या सर्व शाळांना शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर केली असताना सीबीएसई शाळांनीही या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. शैक्षणिक उपक्रमाच्या नावाखाली केवळ शुल्क वसूल करण्यासाठी ही स्पर्धा सुरू आहे. यावरून अशा शाळांना मनमानी करण्यासाठी शिक्षण विभागाकडूनच पाठबळ दिले जात असल्याचे स्पष्ट होत आहे.

हेही वाचा – “भेंडवळचे अंदाज अशास्‍त्रीय आणि ‘बोगस’..!”; शेतकरी नेते अरविंद नळकांडे यांची टीका

…तर जबाबदार कोण?

शासनाने काढलेले परिपत्रकच चुकीचे असून सुधारित परिपत्रक काढण्याची गरज आहे. उष्माघाताची तीव्रता आणि गांभीर्य लक्षात घेता सरसकट शाळांना सुट्टी द्यायला हवी. मात्र या शासन निर्णयानुसार उपक्रमाच्या नावावर केवळ शुल्क वसुलीसाठी विशिष्ट शाळांना सुरू ठेवण्याची सवलत देण्यात आली आहे. शिक्षण विभाग आणि जिल्हा प्रशासन याबाबत निर्णय घेण्यासाठी कोणत्या अनुचित घटनेची वाट पाहत आहे ? तीव्र वातावरणात विद्यार्थ्यांना उष्माघात झाल्यास जबाबदार कोण? असे प्रश्न माजी सिनेट सदस्य प्रवीण उदापुरे यांनी उपस्थित केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Are the students of zilla parishad at risk of heat stroke double standard in the state government circular regarding holiday for schools ksn 82 ssb