नागपूर: गडचिरोलीतील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना नागपूर शहर व नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला.. त्यांना विदर्भ ऑटोरिक्षा चालक फेडरेशनचे अध्यक्ष विलास भालेकर यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भेटले व निवेदन दिले. शहरातील ई- रिक्त व ई- मालवाहूला नियम नाहीत काय? हा प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली.
शहरातील ई- रिक्षामध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी कोंबले जाते. मात्र या वाहनांवर कारवाई होत नाही. उलट ऑटोरिक्षा चालकाने अतिरिक्त घेतल्यास त्यांना दंड केला जातो. ई- मालवाहू वाहनांबाबतही हीच स्थिती आहे. अशा ई- रिक्षा व ई- मालवाहू वाहनांवर कारवाई करावी. सध्या शहरातील बऱ्याच ऑटोरिक्षातील मीटरचे प्रमाणीकरण झाले नाही. त्यामुळे ते करण्यासाठी थोडी मुदत देण्याची गरज आहे, दरम्यान ऑटोरिक्षा चालकांना वर्षाला परवाना शुल्क भरावे लागते. ते भरल्यावर शहरातील अवैध प्रवासी वाहतुकीमुळे ऑटोरिक्षा चालकांचे प्रचंड नुकसान होत आहे.याकडे भालेकर यांनी निवेदनातून लक्ष वेधले.
हेही वाचा: नागपूर: प्रवासी संख्येचे लक्ष्य मेट्रोने गाठले, पण…
विजय चव्हाण यांनी त्यावर योग्य कारवाईचे आश्वसन दिले. याप्रसंगी नवीन प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा पदभार स्विकारल्याबद्दल विलास भालेकर यांनी विजय चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी राजू इंगळे, जावेद शेख, प्रकाश साखरे, अमोल रोकडे, आनंद मानकर, अशोक न्यायखोर, अशोक खडसे, प्रिन्स इंगोले, आसिफ सत्तर उपस्थित होते.