वर्धा : सुरक्षाव्यवस्था सर्वबाजुंनी अभेद्य असावी, अशी काळजी महत्त्वाच्या व्यक्तींसाठी घेतल्या जात असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २० सप्टेंबरला वर्ध्यात सभा होत आहे. त्यासाठी आजपासून मुख्यमार्गावर तसेच सभा स्थळाच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावणे सुरू झाले आहे. जिल्हा पोलीस यंत्रणेखेरीज विशेष सुरक्षादले वर्ध्यात पोहचली आहे. मात्र सभा स्थळ असलेल्या स्वावलंबी मैदान व लगतच्या भागात विशेष लक्ष ठेवल्या जात आहे. सर्व बाजुंनी निगराणी ठेवल्या जात आहे.
हेही वाचा >>> लोकजागर: प्रिया फुकेंच्या निमित्ताने…
सभा व परिसर स्थळ ‘नो फ्लाय झोन’ म्हणून घोषीत करण्यात आला आहे. सभेचे मैदान तसेच पाहुण्यांसाठी तयार करण्यात आलेल्या सर्व हेलीपॅडच्या सभोवतालचा दोन किलोमिटरचा परिसर ‘नो फ्लाय झोन’ म्हणून निगराणीत आला आहे. या परिसरात ड्रोन किंवा तत्सम हवाई साधने, पॅराग्लायडर, पॅरामोटर्स, हॅन्डग्लायडर्स आदींचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी हा मनाई आदेश लागु केला आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचा ईशाराही देण्यात आला आहे. याच मैदानावर विश्वकर्मा योजनेची यशस्वी गाथा दर्शविणारे प्रदर्शन लागणार आहे. प्रदर्शनीत उपस्थित कारागिरांशी पंतप्रधान संवाद साधणार आहे. त्यानंतरच ते सभेला संबोधीत करतील. या प्रदर्शनीचा शामियानादेखील कठोर सुरक्षा कवच्याखाली आहे. सभेच्या दिवशी वाहतूकीत बदल करण्यात आला असून २० सप्टेंबरला सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत जड वाहणांना मनाई करण्यात आली आहे.
हेही वाचा >>> नागपूर : राहुल गांधींवर टीका करणारे भाजप खासदार अनिल बोंडे म्हणाले ” माझे वक्तव्य आई मुलाला रागावते त्या अर्थाने “
सभास्थळाकडे जाणारे सर्व मार्ग २०० मिटरपर्यंत वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहे. तसेच आर्वी नाका ते शास्त्री चौकपर्यंतचा बॅचलर रोड मार्ग नो पार्किंग व नो हॉकर्स झोन म्हणून घोषीत करण्यात आला आहे. व्हीआयपींच्या वाहनांसाठी स्वावलंबी डीएड, जगजीवनराम विद्यालय, शितलामाता मैदान आरक्षीत आहे. सायन्स कॉलेज, इदगाह मैदान, कॉचर मैदान, यशवंत जीनींग, माॅडेल हायस्कूल या ठिकाणी बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. रामनगरातील अग्निहोत्री इंजिनीयरींग कॉलेजच्या परिसरात दुचाकी वाहनांची व्यवस्था झाली आहे. शासकीय विश्रामगृह, आरती चौक, धुनिवाले मठ, न्यु आर्टस कॉलेज, आर्वी नाका, पावडे चौक या भागातून वर्धेकडे येणाऱ्या वाहतूकीस मज्जाव करण्यात आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांनी तसेच नमूद मार्गांनी प्रवास करणाऱ्यांनी वाहतूक व्यवस्थेचा वापर करावा. घोषीत भागातच वाहने ठेवावी, असे आवाहन पोलीस अधिक्षक अनुराग जैन यांनी केले आहे.