नागपूर : गोंदिया जिल्हा न्यायालयात एका प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान वकिलाने थेट न्यायाधीशांसोबतच वाद घातला. वकील आणि न्यायाधीशामध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाल्यावर न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी न्यायाधीशांनी वकिलाला पाच दिवसांची शिक्षा आणि ८० रुपयांचा दंड ठोठावला. सोमवारी गोंदिया जिल्हा न्यायालयात दुपारच्या सुमारास ही घटना घडली. पराग तिवारी (वय ५०) असे शिक्षा सुनावलेल्या वकिलाचे नाव आहे.
तिवारी यांनी दंड भरण्यास नकार दिल्याने त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, न्यायाधीश अभिजित कुलकर्णी यांच्यासमक्ष एका प्रकरणाची सुनावणी सुरू होती. दरम्यान, पक्षकाराचे वकील पराग तिवारी यांना न्यायालयात पोहोचायला विलंब झाला. यावरून न्या. कुलकर्णी यांनी थेट पक्षकाराला वकील बदलविण्याचा सल्ला दिला. यावर तिवारी यांनी आक्षेप घेतला. यावरून न्या. कुलकर्णी व तिवारी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. याप्रकरणी न्या. तिवारी यांना ८० रुपयांचा दंड किंवा दंड न भरल्यास ५ दिवस सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तिवारी यांनी दंड न भरता शिक्षेला स्वीकार केला. यामुळे गोंदिया पोलिसांनी तिवारी यांना ताब्यात घेऊन त्यांची कारागृहात रवानगी केली.
हेही वाचा – सावकाराचा जाच असह्य; शेतकऱ्याने घेतला गळफास…
बार काउंसिल तक्रार करणार
गोंदियातील घटनेबाबत गोंदिया बार काउंसिलने निषेध व्यक्त केला आहे. नागपूर बार काउंसिलचे माजी अध्यक्ष ॲड. कमल सत्तुजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व असलेले मुंबई उच्च न्यायालयातील नागपूर खंडपीठातील न्यायमूर्ती एम. चांदवानी यांच्याशी संबंधित घटनेबाबत तक्रार केली जाणार आहे. वकिलांवर अन्याय करणारी ही घटना असून भविष्यात अशाप्रकारच्या घटना घडू नये यासाठी उपाययोजना करण्याची विनंती केली जाणार आहे. तिरोरा बार असोसिएशनेदेखील याबाबत परिपत्रक काढून निषेध व्यक्त केला आहे.