पदनाम संपादक म्हणून नमूद केल्याने आक्षेप
राजेश्वर ठाकरे
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’ या मराठी अनुवादित ग्रंथाचे मोठय़ा प्रतीक्षेनंतर अखेर प्रकाशन झाले. परंतु या ग्रंथावर डॉ. आंबेडकर चरित्र-साधने प्रकाशन समितीच्या सदस्य सचिवांनी आपले पदनाम संपादक म्हणून नमूद केल्याने नवा वाद निर्माण झाला असून विविध संघटनांनी त्यावर आक्षेप घेतला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्थशास्त्रावरील ग्रंथ ‘प्रॉब्लेम ऑफ रूपी’चा मराठी अनुवाद १३ वर्षांपासून प्रकाशनअभावी पडून होता. वर्धेचे प्रा. डॉ. विजय कविमंडन यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला आहे. अखेर या अनुवादित ग्रंथाचे प्रकाशन १६ डिसेंबरला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. यात संपादक म्हणून समितीचे सदस्य सचिव प्रा. डॉ. प्रदीप आगलावे यांचे नाव छापण्यात आले आहे. यास समाजातील विविध घटकांनी विरोध केला आहे. बाबासाहेबांच्या साहित्याचे संपादन करणारे संपादक पहिल्यांदा बघितले आहे. बाबासाहेबांच्या साहित्यांचे संपादन कोणी करू शकत नाही. डॉ. प्रदीप आगलावे यांनी चुकीचा पायंडा पाडला आहे. त्यामुळे त्यांना सदस्य सचिव पदावरून तत्काळ हटवावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नागपूरचे शहराध्यक्ष प्रकाश कुंभे यांनी केली आहे.
दरम्यान, आगलावे यांनी हे आक्षेप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या म्हणण्यानुसार, आधीच्या सदस्य सचिवांचे देखील संपादक म्हणून नाव प्रकाशित झाले होते. येथे अनुवादाचे संपादन हा अर्थ अभिप्रेत आहे. बाबासाहेबांच्या मूळ साहित्याचे संपादन नव्हे. या ग्रंथाचे अनुवादक डॉ. विजय कविमंडन यांनी या वादाला फार महत्त्व दिले नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार, मराठी अनुवाद लोकांच्या हाती घेणे आवश्यक होते. ते आले आहे. त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले आहे. शिवाय त्यांनी मराठी अनुवाद प्रकाशित होत नसल्याबद्दल लोकसत्ताने पाठपुरावा केला होता, त्याबाबत आभारही मानले आहेत.
अनुवाद झालेला हा पहिला खंड आहे. बाबासाहेबांच्या मूळ साहित्याचे २२ खंड झाले. बाबासाहेबांनी लिहिलेले साहित्य एकत्रित करण्याचे काम सदस्य सचिव करायचे म्हणून इंग्रजी खंडावर संकलन (कम्पाइल्ड बाय) असे लिहायचे. यापूर्वी २००८ मध्ये हा खंड प्रकाशित होणार होता. त्यावेळी प्रा. हरी नरके समितीचे सदस्य सचिव होते. संगणक प्रत, डीटीपी तयार झाली होती. त्यावर हरी नरके यांनी संपादक असे लिहिले होते. ते प्रकाशित होऊ शकले नव्हते. अनुवाद केल्यानंतर त्यात काही सुटले काय हे बघण्याचे काम कोणीतरी करावेच लागते, असे प्रा. डॉ. विजय कविमंडन म्हणाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्य मालिकेत सोअर्स मटेरियल खंड क्रमांक ३-१ जनता खंडाचे प्रकाशन १४ एप्रिल २०२१ रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते झाले. त्यावेळी समितीचे सदस्य सचिव दिवंगत डॉ. कृष्णा कांबळे होते. या खंडात प्रकाशनासंदर्भात या शीर्षकाखाली डॉ. प्रदीप आगलावे यांचे सदस्य सचिव म्हणून मनोगत छापले आहे, जेव्हा की, डॉ. कांबळे यांचे सदस्य सचिव म्हणून नाव असणे क्रमप्राप्तच आहे, याकडे भारतीय पँथरचे अध्यक्ष प्रकाश बन्सोड यांनी लक्ष वेधले.