लोकसत्ता टीम
अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील खासदारांचे कार्यालय ताब्यात देण्यात न आल्याने काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आणि नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखडे यांच्यासह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन केले. कार्यकर्त्यांनी खासदारांच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. त्यानंतर बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर यांनी कार्यालयात प्रवेश केला. त्याआधी याच मुद्यावरून यशोमती ठाकूर आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात बाचाबाची झाली.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात खासदार जनसुविधा केंद्र उघडण्यात आले आहे. आतापर्यंत माजी खासदार नवनीत राणा या कार्यालयाचा वापर करीत होत्या. बळवंत वानखडे हे निवडून आल्यानंतर संबंधित कार्यालयाचा ताबा मिळावा, यासाठी पत्रव्यवहार केला, पण प्रशासनाने त्यांना कार्यालयाचा ताबा दिला नाही. बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर यांनी या संदर्भात आंदोलनाचा इशाराही दिला होता.
आणखी वाचा-चंद्रपूर : पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या, शेतकरी चिंतातूर
दरम्यान आज जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे वार्षिक योजना आढावा बैठकीसाठी अमरावतीत आगमन झाले. ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचल्यावर बळवंत वानखडे आणि यशोमती ठाकूर त्यांच्या भेटीसाठी पोहचल्या. खासदारांचे कार्यालय अजूनही ताब्यात मिळालेले नाही. हा दुजाभाव आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी केला. तीन मिनिटांपुर्वीच हा विषय आपल्यासमोर आला आहे. हे प्रकरण समजून घेण्यासाठी आपल्याला वेळ द्या, असे चंद्रकांत पाटील यांनी यशोमती ठाकूर यांना सांगितले. पण, यशोमती ठाकूर संतापल्या. बळवंत वानखडे निवडून आल्यानंतर तीन तास त्यांना प्रमाणपत्र दिले जात नाही. खासदारांचे कार्यालय उपलब्ध करून देण्यात येत नाही. निधी मिळत नाही. नवीन खासदारांचा सन्मान केला जात नाही. हे सर्व खपवून घेतले जाणार नाही. वाटल्यास आमच्यावर गुन्हे दाखल करा, पण आम्ही आज कार्यालयाचा ताबा घेणारच, असे सांगून यशोमती ठाकूर आणि बळवंत वानखडे हे तेथून बाहेर पडले.
आणखी वाचा-धक्कादायक! हिवतापाच्या रुग्णसंख्येत वाढ; गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात…
कार्यकर्त्यांनी खासदारांच्या कार्यालयाचे कुलूप तोडल्यानंतर बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर यांनी कार्यालयात प्रवेश केला. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकारची, प्रशासनाची दादागिरी सुरू आहे. वार्षिक योजना बैठकीला लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला बोलावले जात नाही, सन्मान मिळत नाही. ही दादागिरी का म्हणून सहन करायची. उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाई असताना पालकमंत्री जिल्ह्यात आले नाहीत, प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे, असा आरोप यशोमती ठाकूर यांनी पत्रकारांशी बोलताना केला. प्रशासनाच्या असहकार्यामुळे आम्हाला आंदोलन करावे लागले, असे बळवंत वानखडे म्हणाले.