लोकसत्ता टीम

अकोला: दारूचे व्यसन करून पत्नी व मुलांना मारहाण करणाऱ्या व्यसनाधीन वडिलांची मुलानेच दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शहरातील पंचशील नगरात घडली.

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून मुलाला ताब्यात घेतले आहे. किशोर विश्राम पाईकराव (४०, रा. वाशीम) असे मृत वडिलांचे तर, जितेंद्र किशोर पाईकराव (१८) असे मुलाचे नाव आहे.

किशोर विश्राम पाईकराव यांना दारूचे व्यसन असल्याने त्यांचे पत्नीसोबत वाद होत होते. त्यातून किशोर पत्नीला, मुले जितेंद्र आणि अश्विन यांनाही मारहाण करत होते. सततच्या वादाला कंटाळून पत्नी माया आणि मुलांनी वडिलांपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. एका वर्षांपूर्वी आई आणि मुले वाशीममधून अकोला शहरात राहण्यासाठी आले.

आणखी वाचा-चंद्रपूर : सासऱ्याची चाकू भोसकून हत्या करणाऱ्या जावयास आजन्म करावास; जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल

पती अधून-मधून येत पत्नी व मुलांशी वाद घालत होता. पती शुक्रवारी दुपारी दारू पिऊन पत्नीच्या घरी आला आणि त्याने वाद घातला. पत्नीला मारहाणही करत होता. हा प्रकार मोठा मुलगा जितेंद्र याच्या लक्षात येताच त्याने वडिलांना समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वडिलांनी त्यालाही मारहाण करण्यास सुरुवात केली. वडील व मुलामधील वाद विकोपाला गेला.

जितेंद्रने वडिलांच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत वडील गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले. आरोपी मुलाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. वडिलांची हत्या केलेला मुलगा जितेंद्र याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती.

Story img Loader