अमरावती : अचलपूरचे आमदार बच्चू कडू आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यातील वाद चांगलाच उफाळून आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संघर्ष मिटवण्यासाठी मध्यस्थीचे प्रयत्न सुरू केले असताना बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा रवी राणांवर टीका केली आहे. ‘आम्ही कुणाचीही पर्वा करीत नाही, राणा-पान्याला हवेत फुटाण्यासारखे फोडून टाकू,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.तिवसा येथे रविवारी प्रहार संघटनेच्या वतीने बच्चू कडू यांची रक्ततुला करण्यात आली. प्रहारच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना कडू पुन्हा आक्रमक झाले. ते म्हणाले, ‘सामान्य माणूस हाच आमचा आधार आहे, सामान्य व्यक्ती आमच्यासाठी देवासमान आहे. ज्यावेळी सामान्य माणूस अडचणीत आलेला दिसेल, तेव्हा आम्ही आमदारकीचाही विचार करणार नाही, हे पद दूर सारून एक सामान्य कार्यकर्ता म्हणून लढाईत उतरू.

हेही वाचा >>>नागपूर : दिवाळीनिमित्त गावी जाण्यासाठी तरूण दाम्पत्याने ट्रकला हात दाखवला , पुढे घडले असे की…

राजकारणात अनेक तडजोडी कराव्या लागतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेस पक्षाचे विचार रूचत नव्हते, तरी त्यांनी काँग्रेसला सहकार्य केले. पण मूळ तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनाही तह करावे लागले, पण त्यांनी रयतेची सेवा हे तत्त्व कायम ठेवले. आपणही त्याच विचारांवर कार्य करीत असून सामान्य माणसाच्या हिताव्यतिरिक्त दुसरा कोणताही विचार आपल्या मनात नाही. बच्चू कडू कधीही कपट बाळगणारा नाही.’

हेही वाचा >>>अमरावतीत दोन मजली इमारत कोसळल्याची दुर्दैवी घटना, चौघांचा मृत्यू; उपमुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

‘कुणी आपल्या गालावर झापड मारली, तर आम्ही दुसरा गाल पुढे करणारे नाहीत. आमच्या अंगात भगतसिंह येतो, हे लक्षात घ्या. हम उडा भी सकते ….’, असा गर्भीत इशाराही कडू यांनी यावेळी दिला.

दुसरीकडे, रवी राणा यांनी आज मुख्यमंत्र्यांची मुंबईत भेट घेतली, तर बच्चू कडू उद्या भेट घेणार असल्याचे सांगण्यात येते. आता हे दोन नेते काय भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Story img Loader