लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : वाहनाच्या धडकेत वन्यजीवांचा अपघात ही वन्यजीव संरक्षणातील जागतिक समस्या आहे. संरक्षित क्षेत्रालगतच्या भागात किंवा सामान्य रस्त्यावरील आणि महामार्गांवर होणारे विविध वन्यप्राण्यांचे मृत्यू होतात. अमरावती येथील कूला वाइल्ड फाउंडेशन आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यावर केलेल्या अभ्यासाची नोंद युरोपिअन जर्नल ऑफ इकॉलॉजी येथे घेण्यात आली आहे.

या शोधपत्रिकेत त्यांचा अभ्यास स्विकारण्यात आला असून लवकरच प्रकाशित होणार आहे. अमरावती येथील मंदार पावगी, डॉ. योगेश जोशी, डॉ. सावन देशमुख, अनुप पुरोहित आणि केदार पावगी यांनी तो सादर केला आहे. गेल्या सहा वर्षांपासून ते यावर काम करत आहेत. २०१८ मध्ये तपशिल संकलित करण्यासाठी नागरिक विज्ञान कार्यक्रमाचा एक भाग म्हणून कूला वाइल्ड फाउंडेशन यांनी अँड्रॉइड भ्रमणध्वनीसाठी एक विनामूल्य ‘आर्म’ भ्रमणध्वनी ॲप आणि डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट आर्म डॉट ओआरजी डॉट इन हे संकेतस्थळ सुरू केले.२०२१-२२ मध्ये त्यांनी अमरावती जिल्ह्यातील राज्य, राष्ट्रीय, ग्रामीण इत्यादी रस्त्यांचे संपूर्ण जाळे व्यापून सुमारे दहा हजार किलोमीटरहून अधिक रस्त्यांचे पद्धतशीर सर्वेक्षण केले. संपूर्ण जिल्हा स्तरावर वन्यप्राणी रस्ते अपघात तपशील गोळा करण्याचा भारतातील हा पहिलाच प्रयत्न होता.

आणखी वाचा-पत्नीच्या नावे टपाल योजनांची वसुली, खातेदार रस्त्यावर

२०१८ ते २०२२ या काळात नागरिक विज्ञान आणि कूला वाइल्ड फाउंडेशनच्या प्रयत्नांद्वारे ७० विविध प्रजातींमधून ३६४ रस्ते अपघात नोंदवले. यात ३३६ वन्यप्राणी आणि २८ पाळीव प्राण्यांच्या मृत्यूचा समावेश आहे. यापैकी कूला वाइल्ड फाउंडेशनच्या प्रयत्नात मिळालेले निष्कर्ष धक्कादायक असून या विषयाचे गांभीर्य आणि व्यापकता अधोरेखित करतात. २०२१-२२ मध्ये या संशोधकांना केवळ आठ महिन्यात ११६ वन्यप्राण्यांचे रस्ते अपघाताच्या घटना मिळाल्या. अंदाजे सरासरी एका दिवशी दोन अपघात झाले. यात तडस, खोकड, कोल्हा, मृदू-कवच कासव, घोरपड, खापरखवल्या, भारतीय करवानक, भारतीय रातवा, जंगली लावा आदी सस्तन प्राणी, पक्षी, सरीसृप अशा अनेक धोकाग्रस्त प्रजातींचा समावेश आहे. विस्तारित महामार्गांचे जाळे आणि वाहन खरेदीत होणारी प्रचंड वाढ यामुळे भविष्यात या समस्येचा अधिक मोठा धोका निर्माण होणार आहे. वन्यजीवप्रेमी, अभ्यासक, वनखात्यातील विविध अधिकारी व कर्मचारी तसेच सामान्य नागरिकांनी हे ॲप डाऊनलोड करुन जास्तीतजास्त तपशील त्यात नोंदवावा, असे आवाहन कूला वाइल्ड फाउंडेशन व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.

आणखी वाचा-नागपूर : दीक्षाभूमीवरील वाहनतळासाठीचे खड्डे बुजवणार, नासुप्रच्या बैठकीत निर्णय

वन्यप्राण्यांच्या रस्ते अपघाताची नोंद होत नाही. त्यावर मात करणे आणि रस्ते अपघातात किती वन्यप्राण्यांचा मृत्यू झाला, किती जखमी झाले याविषयीचा तपशील सहज मोफत उपलब्ध होईल, असा नकाशा तयार करणे हे आमच्या प्रकल्पाचे उद्दीष्ट आहे. हे संकेतस्थळ आणि भ्रमणध्वनी ॲपमधून तयार होणारा तपशील रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या वन्यप्राण्यांचीसंख्या कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आखण्यात किंवा अमलात आणण्यात मदत करेल, अशी अपेक्षा आहे. -मंदार पावगी, कुला वाइल्ड फाउंडेशन

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Arm mobile app will work for information about accidental death of wild animals mrj
Show comments