आधुनिक शिक्षण, प्रशिक्षणाची सोय; संस्था प्रमुख ब्रिगेडिअर विनोद कुमार यांचे मत

विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जगभरातील शिक्षण आणि प्रशिक्षणाची पद्धत आणि युद्ध डावपेच सातत्याने बदलत आहेत. या बदलानुरूप अत्याधुनिक शिक्षण आणि प्रशिक्षण उपलब्ध करून राष्ट्राच्या आकांक्षा पूर्ण करण्याचे आव्हान ‘आर्मी एज्युकेशन कोअर’ यशस्वीपणे पेलत आहे, असे प्रशिक्षण संस्थेचे प्रमुख ब्रिगेडिअर विनोद कुमार यांनी सांगितले.

विनोद कुमार यांनी फेब्रुवारी २०१४ मध्ये संस्थेची सूत्रे स्वीकारली. साडेतीन वर्षांपासून या संस्थेत प्रशिक्षण देण्याच्या पद्धती आधुनिक करण्याचे काम केले आहे. ते ३० जून २०१७ ला निवृत्त झाले. त्या पाश्र्वभूमीवर त्यांच्याशी बातचित केली असता त्यांनी संस्थेचे सैन्यदल आणि राष्ट्राच्या दृष्टीने असलेले महत्व विशद केले. देशाच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी शिक्षण आहे. ते अद्ययावत आणि योग्य पद्धतीने सैन्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम ही संस्था करते. राष्ट्राची जशी आवश्यकता असेल त्यानुसार वेळोवेळी नवीन अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण सुरू केले जाते.

देशात भारतीय सैन्य शैक्षणिक कॉर्प्स ही संस्था १५ जून १९२१ ला स्थापन करण्यात आली. त्यावेळी ४५ अधिकारी आणि सुमारे साडेसातशे जवान यात होते. ब्रिटिश सैन्य दल शाखेकरिता वेलिंग्टन आणि भारतीय सैन्य दलाच्या शाखेकरिता बेलगाम येथे शिक्षण व प्रशिक्षण केंद्र १९२१ ला सुरू झाले. त्यानंतर बेलगाम येथील शिक्षण व प्रशिक्षण केंद्र १९३९ ला मध्यप्रदेशातील पचमढी येथे स्थानांतरित करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर १९४७ ला ‘रॉयल आर्मी एयुकेशल कॉर्प्स’ हे ‘इंडियन आर्मी एज्युकेशनल कॉर्प्स’ झाले. या संस्थेतील प्रत्येक जण पदवीधर आहे. प्रत्येकाला शिक्षण घेऊन आपापल्या क्षमतेनुसार सर्वोच्च पदापर्यंत पोहचण्यासाठी संधी उपलब्ध केल्या जातात. या संस्थेत अनेक विदेशी भाषा शिकवल्या जातात.  चीनच्या युद्धानंतर १९६३ मध्ये विदेशी भाषा विभागाने चिनी आणि तिबेटियन भाषेचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. २००६ पासून अरेबियन, पर्शियन, पुश्तो, रशियन आणि सिंहली भाषा सुरू करण्यात आल्या आहेत.

भारतीय सशस्त्र दलातील जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी नोव्हेंबर १९५० या केंद्रात संगीत शाखा सुरू करण्यात आली. यामध्ये तीनही दलातील सैनिक प्रशिक्षण घेतात.  त्यांच्यातील संगीत कौशल्य बघून पदोन्नती दिली जाते. येथील संगीत विभाग हा आशिया खंडात वरच्या क्रमांकावर आहे. सशस्त्र दलासाठी अत्यंत महत्त्वाचे, किंबहुना अविभाज्य घटक असलेल्या नकाशा वाचन विभाग १९५५ ला सुरू करण्यात आला आहे. अतिशय उत्तम दर्जाचे प्रशिक्षण आणि उच्चत्तम प्रतीच्या पायाभूत सुविधा आहे. त्यामुळे १९८५ ला स्वायत्त संस्थेचा दर्जा प्राप्त झाला. ‘नॅक’ने संस्थेला ‘अ’ श्रेणी दिलेली आहे.

भाषा, नकाशा

येथे देश-विदेशातील सैन्य अधिकारी विविध भाषा शिकायला येतात. त्यानंतर ते आपापल्या युनिटमध्ये त्या भाषेचे प्रशिक्षण देतात. जंगल युद्धात महत्त्वाचे ठरणारे नकाशा वाचन येथे शिकवले जाते. यासाठी देखील तीनही सैन्यदलातील अधिकारी येथे येतात. त्यांना विविध कालावधीचे अभ्यासक्रम पूर्ण करायचे असतात.

शिक्षक-सैनिक

समाजात शिक्षक आणि सैनिक हे दोघेही महत्त्वाची भूमिका बजावतात. या संस्थेत दोन्ही एकत्र आहेत. भारतीय सशस्त्र दलात सहभागी अधिकाऱ्याला येथे शिक्षक होता येते. कोणत्याही शाखेचा पदवीधर येथे दाखल होऊ शकतो  ब्रिगेडिअर विनोदकुमार