अकोला : जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील जवान प्रवीण जंजाळ हे शहीद झाले. या घटनेत एकूण दोन जवान शहीद झाले आहेत. सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्युत्तरात चार दहशतवादी ठार झाले आहेत. प्रवीण जंजाळ हे शहीद झाल्याची माहिती गावात पोहोचताच गावावर शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी दहशतवादी असल्याची गुप्त माहिती सुरक्षा दलाला प्राप्त झाली होती. सुरक्षा दलाच्या पथकाने दहशतवादविरोधी कारवाई शनिवारी सुरू केली. सुरक्षा पथक व दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. दोन्ही बाजूने गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यात अकोल्यातील जवान शहीद झाला आहे. अकोला जिल्ह्यातील मोरगाव भाकरे गावातील प्रवीण जंजाळ हा तरुण जवान शहीद झाला आहे.

हेही वाचा…चंद्रपूर : पेट्रोल बॉम्बचा स्फोट आणि गोळीबाराने बल्लारपूर हादरले

२०१९ मध्ये प्रवीण जंजाळ हे भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. त्यांचे गेल्या वर्षी लग्न झाले होते. नुकतेच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. त्यातच कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. प्रवीण जंजाळ हे चार महिन्यांपूर्वीच गावी सुटीवर आले होते. प्रवीण यांची कुटुंबासोबतची ही शेवटची भेट ठरली. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले होते. प्रवीण यांनी आपल्या वडिलांना घराच्या बांधकामसाठी दोन दिवसांपूर्वीच काही रक्कम देखील पाठवली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. शहीद जवानावर त्यांच्या मोरगाव भाकरे या गावात शासकीय आणि लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. शहीद जवानाचे पार्थिव गावात केव्हा पोहचणार आहे, याची माहिती अद्याप जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेली नाही. प्रशासनाकडून प्राथमिक तयारी सुरू करण्यात आली. मोरगाव भाकरे गावातील तरुणाला वीरमरण आल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा…पत्नीच्या नावे टपाल योजनांची वसुली, खातेदार रस्त्यावर

सैन्य दलात सेवेची जंजाळ कुटुंबांची परंपरा

भारतीय सैन्य दलात सेवा देण्याची जंजाळ कुटुंबांची परंपरा चालत आली आहे. जंजाळ कुटुंबातून प्रवीण हे सैन्यदलात दाखल झालेले तिसरे जवान होते. त्यांच्या पूर्वी त्यांचे मोठे बाबा भास्करराव बाजीराव जंजाळ व त्यांचे काका रविंद्र जंजाळ हे सैन्यदलात होते. भास्करराव यांचे चार वर्षांपूर्वी हृदविकाराने निधन झाले आहे. आता सैन्य दलात सेवा देताना प्रवीण जंजाळ याला वीरमरण आले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Army jawan pravin janjal from akola martyred in jammu and kashmir s kulgam terrorist encounter ppd 88 psg
Show comments