यवतमाळ : वणी तालुक्यातील मुर्धोनी येथील मूळ निवासी लेफ्टनंट कर्नल वासुदेव दामोदर आवारी (३५) यांचा भारत-चीन सीमेवर अरुणाचल प्रदेशात कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला.

ले. कर्नल वासुदेव आवारी यांचे पार्थिव आज गुरुवारी लष्कराच्या विशेष विमानाने नागपूर येथे आणण्यात आले. विमानतळावरच कामठी मिलिट्री बेसतर्फे त्यांना मानवंदना दिली गेली. त्यानंतर लष्करी वाहनाने त्यांचे पार्थिव रात्री वणी येथे आणण्यात आले. उद्या, शुक्रवारी ७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजता त्यांचे मूळ गाव मुर्धोनी येथील सामुदायिक प्रांगणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

ले. कर्नल वासुदेव दामोदर आवारी हे १७० फिल्ड रेजिमेंट वीर राजपूरमध्ये कर्तव्यावर होते. नुकतीच त्यांना मेजर पदावरून लेफ्टनंट कर्नलपदी पदोन्नती मिळाली होती. अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवर समुद्रसपाटीपासून १६ हजार फूट उंचीवर कर्तव्य बजावत असताना मंगळवारी ४ ऑक्टोबरला त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. सहकाऱ्यांनी त्यांना तत्काळ गुवाहाटीतील मिल्ट्री रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वणीतील सुप्रसिद्ध कीर्तनकार डॉ. दामोदर आवारी यांचे वासुदेव हे धाकटे पुत्र होते. त्यांचे शालेय शिक्षण वणी येथील विवेकानंद विद्यालयात झाले. त्यांनी एनडीएमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर ते भारतीय सेनेत मेजर या पदावर रूजू झाले होते. सैन्यदलात अधिकारी असले तरी वणी तालुक्याशी त्यांची नाळ जुळली होती. परिसरातील तरुणांना ते कायम एनडीए, सैन्य भरती, पोलीस भरतीसंदर्भात मार्गदर्शन करायचे. येत्या दिवाळीत ते वणी व मुर्धोनीत येणार होते. मात्र, त्यापूर्वीच देशसेवा करत असलेल्या या सुपुत्राच्या अनपेक्षितपणे झालेल्या निधनाने मुर्धोनीसह वणी शहरात शोक व्यक्त होत आहे.

Story img Loader