सैन्यात मोठ्या पदावर असलेल्या संबंधित महिलेचा छळ करणारा पतीदेखील सैन्यातच ‘लेफ्टनंट कर्नल’ पदावर कार्यरत आहे. अनेक वर्ष छळ सहन केल्यानंतर अखेर महिलेने पोलिसांकडे धाव घेतली व पतीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या प्रकरणामुळे सैन्य वर्तुळात खळबळ उडाली आहे. जुनी कामठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हे प्रकरण आहे. दोघेही पती-पत्नी सैन्यात अधिकारीपदावर असून सात ते आठ वर्षांअगोदर दोघांचे लग्न झाले. महिला नागपूर जिल्ह्यात कार्यरत असून पतीची ‘पोस्टिंग’ पश्चिम बंगालमध्ये आहे.

हेही वाचा >>>धक्कादायक… करोनानंतर ‘सिझेरियन’द्वारे प्रसूतीचे प्रमाण वाढले!

सुरुवातीपासूनच दोघेही वेगवेगळ्या जागांवर कार्यरत असल्याने तीन महिन्यांतून एकदा भेटायचे. २०१७ मध्ये दोघांचीही ‘पोस्टिंग’ उत्तरप्रदेशमध्ये झाली व त्यानंतर छळवणूकीचा प्रकार सुरू झाला. लहान लहान गोष्टींवर पती पत्नीला शिवीगाळ करत मारहाण करायचा. पत्नी सैन्यात अधिकारी असली तरी बदनामी नको म्हणून ती छळ सहन करत होती. बाळ झाल्यावरदेखील पतीत सुधारणा झाली नाही व अगदी महिलेच्या आईवडिलांसमोर तिला दारूच्या नशेत मारहाण करण्यात आली. अगदी पत्नीचा गळा दाबून तिला जीवे मारण्यापर्यंतदेखील त्याची मजल गेली होती.

हेही वाचा >>>नागपूर : ‘ब्रेक अप’ करणाऱ्या तरुणीच्या घरात प्रियकर चाकू घेऊन…

प्रत्येकवेळी पती तिला मारहाण करायचा व दुसऱ्या दिवशी माफी मागून नामानिराळा व्हायचा. बाळाच्या भवितव्यासाठी पत्नीदेखील मौन बाळगून होती. अधिकारी महिलेची नागपूर जिल्ह्यात बदली झाली, तर पतीची पोस्टिंग पश्चिम बंगालमध्ये होती. काही आठवड्यांअगोदर तिचा पती तिला व मुलीला भेटायला आला होता. तो जबरदस्तीने बाळाला फिरायला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, महिलेने विरोध केला असता तिला सार्वजनिक जागेवरच शिवीगाळ करत धक्काबुक्की केली व तिचा मोबाईलदेखील फोडला. या प्रकारामुळे महिला दहशतीत होती. अखेर तिने जुनी कामठी पोलीस ठाण्यात पतीविरोधात तक्रार दाखल केली.

पोलीसदेखील हे प्रकरण ऐकून आश्चर्यचकित झाले. पोलिसांनी ‘लेफ्टनंट कर्नल’ असलेल्या पतीविरोधात गुन्हा नोंदविला आहे.