कविता नागापुरे, लोकसत्ता
नर्सिंगचा अभ्यासक्रम पूर्ण करून रुग्णांची सेवा करू पाहणाऱ्या विद्यार्थिनींचे स्वप्न शहरातील अरोमिरा नर्सिंग कॉलेजमुळे भंग झाले आहे. या महाविद्यालयाने विद्यार्थिनींनीचीच नव्हे तर इंडियन नर्सिंग काऊन्सिलचीही फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती आता समोर येत आहे. या महाविद्यालयाच्या विरोधात आता विद्यार्थिनींनी बंड पुकारले असून फसवणुकीसह मानसिक छळाची तक्रार पोलीस अधीक्षक लोहित मतानी यांच्याकडे विद्यार्थिनींसह एआयएसएफचे राज्य सचिव वैभव चोपकर यांनी केली आहे.
भंडारा शहरातील रमाबाई आंबेडकर वार्ड स्थित अरोमीरा स्कूल ऑफ नर्सिंग तथा अरोमिरा नर्सिंग कॉलेज येथे एएनएमचे शिक्षण घेत असलेल्या १८ विद्यार्थिनींचे रजिस्ट्रेशन न करताच प्रवेश शुल्क घेऊन महाविद्यालयात प्रवेश देवून विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या विद्यार्थीनींनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचा आणि सुरू असलेल्या भोंगळ कारभाराचा पाढाच वाचला.
हेही वाचा >>> विदर्भातील शिंदे गटाच्या खासदारांच्या प्रश्नामुळे केंद्र सरकारचे पितळ उघड
सदर महाविद्यालयाने विद्यापीठाच्या आणि इंडियन नर्सिंग काऊन्सिलच्या कोणत्याच निकषांचे पालन केलेले नाही. या महाविद्यालयात पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचे निदर्शनास आले आहे. अरोमीरा स्कूल ऑफ नर्सिंग आणि अरोमिरा नर्सिंग कॉलेज अशा दोन नावांनी सदर महाविद्यालय चालविले जात आहे. मात्र प्रत्यक्षात कॉलेजची इमारत एकच आहे. नर्सिंग महाविद्यालय संस्थात्मक क्षेत्रातच असावे असा नियम असताना सदर महाविद्यालय मात्र रेसिडेन्सीअल क्षेत्रात आहे. महाविद्यालयाची इमारत सुसज्ज व प्रशस्त नसून मोकळी जागा किंवा क्रीडांगणच नाही. महाविद्यालयातील प्रयोगशाळा नाममात्र असून ४० विद्यार्थी बसतील एवढीही सुविधा, खुर्च्या, टेबल, कपाट नाही.
असे असताना प्रयोगशाळेसाठी साहित्य खरेदीच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारले जाते. वार्षिक स्नेहसंमेलनचे २००० रुपये, महाविद्यालयीन विविध उपक्रमाचे ५०० रुपये, स्टुडंट्स युनियन फी ३००० रुपये, उशीर झाल्यास किंवा गैरहजर राहिल्यास ५०० रुपये अशा विविध कारणांवरून विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क आकारून विद्यार्थ्यांची लूट केली जाते मात्र त्याची पावतीही दिली जात नाही. सोयी सुविधा नसल्याने ड्यूटीच्या नावाखाली विद्यार्थिनींना सामान्य रुग्णालयात पाठविण्यात येत असून अनेकदा विद्यार्थी संख्या जास्त झाली की बसण्याची सोय नसल्याने विद्यार्थिनींना खाली दरी घालून बसावे लागत असल्याचे विद्यार्थिनींनी लोकसत्ता सोबत बोलताना सांगितले. कोणतेही शुल्क भरल्यास रीतसर पावती देण्यात येत नसून एका वहीमध्ये लिहून त्याची फोटोकॉपी विद्यार्थिनींना दिली जाते. विद्यार्थींनीना अद्याप ओळखपत्र दिले गेलेले नाही.
हेही वाचा >>> काँग्रेसच्या व्यासपीठावर कलावती, अमित शाहांना सुनावले, म्हणाल्या …
वसतिगृहात विद्यार्थी राहत नसताना सुद्धा सर्वच विद्यार्थ्यांकडून वसतिगृह शुल्क आकारले जाते. महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी एकच शौचालय असून नियमितपणे स्वच्छता होत नसल्याने विद्यार्थिनींची गैरसोय होते असून त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महाविद्यालयात सुसज्ज ग्रंथालय व अभ्यासिका नाही. सदर महाविद्यालय २०१० पासून सुरू असून असाच भोंगळ कारभार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. इंडीयन काउन्सिलच्या कोणत्याच निकषांची व मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता या महाविद्यालयाने केली नसून सदर महाविद्यालयावर कायदेशीर कारवाई करून महाविद्यालयाची मान्यता रद्द करावी तसेच सर्व विद्यार्थिनींना शासकीय महाविद्यालयामध्ये सामावून घ्यावे अशी मागणी अन्यायग्रस्त विद्यार्थिनिंसह ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशनच्या वतीने करण्यात आली आहे.