भंडारा : अरोमिरा नर्सिंग महाविद्यालयात एएनएमच्या प्रथम वर्षाला असलेल्या १८ विद्यार्थिनींची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर संस्थाचालक वर्षा साखरेसह प्राचार्या सुसन्नां थालापल्ली, राकेश निखाडे आणि जयश्री कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र ज्या दिवशी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भंडारा पोलीस ठाण्यात सुरू होती त्याच दिवशी दुपारी आरोपी संस्थाचालक वर्षा साखरे ही पोलीस ठाण्यात आली होती, असे विद्यार्थिनींनी लोकसत्ताशी बोलतांना सांगितले. त्यानंतर गुन्हा दाखल होताच वर्षा साखरेसह जयश्री कडू आणि सुसन्नां थालापल्ली या तिघी मागील ४ दिवसांपासून मोकाट आहेत. पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक या तिघींना अभय देत असल्याचा आरोप विद्यार्थिनींसह एआयएसएफचे राज्य सचिव वैभव चोपकर यांनी केला आहे.
अरोमिरा नर्सिंग महाविद्यालय फसवणूक प्रकरण आता चांगलेच तापले असून मागील १५ दिवसांपासून विद्यार्थिनींनी न्यायासाठी उपोषण सुरू केले आहे. या उपोषणामुळे प्रशासनावर दबाव आल्याने महिनाभरानंतर अखेर दि. २७ सप्टेंबर रोजी महाविद्यालय प्रशासनाच्या विरोधात भंडारा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. २७ रोजी तक्रार लिहिण्यासाठी सलोनी, साक्षी, नेहा, अपेक्षा, निकिता व इतर काही विद्यार्थिनींना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले होते. दुपारी १ वाजतापासून रात्री ८ वाजतापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे या विद्यार्थिनी ७ तास पोलीस ठाण्यातच होत्या. राकेश निखाडे याला १ वाजतापासूनच पोलिसांनी नजर कैदेत ठेवले होते. मात्र यात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. एफआयआर लिहिण्याची प्रक्रिया सुरू असताना सायंकाळी ४ ते ६ वाजता दरम्यान आरोपी संस्थाचालक वर्षा साखरे तिच्या मुलासोबत पोलीस ठाण्यात आली होती. त्यानंतर ती निखाडे याला भेटली आणि नंतर ठाण्याच्या आवारात ती पूर्ण वेळ फोनवर बोलत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. ती २० ते २५ मिनिटे ठाण्यात असल्याचे विद्यार्थिनीचे म्हणणे असून पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील त्या दिवशीचे फुटेज सार्वजनिक करण्याची मागणी पोलीस प्रशासनाला करणार असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. एफआयआर लिहिताना त्यात तीन वेळा चुका करून वारंवार लिहून पोलिसांनी मुद्दाम ७ तास लावले असा आरोपही विद्यार्थिनींनी केला आहे.
हेही वाचा – महिला उपसरपंचाचा पतीसह अवयवदान व देहदानाचा संकल्प
राकेश निखाडे फरार होऊ नये म्हणून पोलिसांनी त्याला दुपारपासूनच ठाण्यात ठेवले होते. असे असताना आरोपी वर्षा साखरे ही पोलीस ठाण्यात आलेली असताना पोलिसांनी तिला का जाऊ दिले, चार दिवसांपासून मुख्य आरोपीसह दोन आरोपी मोकाट असल्यामुळे पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेवर चोपकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
हेही वाचा – Monsoon Update: मुंबईसह मध्य महाराष्ट्रात आज पावसाची शक्यता, कोकणाला ऑरेंज अलर्ट
सध्या न्यायालयाला सुट्टी असल्याने आरोपींना अटकपूर्व जामीन मिळविता येणार नाही त्यामुळे न्यायलयाचे कामकाज सुरू होण्याची वाट पोलीस पाहत आहेत का, पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का असा सवालही चोपकर यांनी उपस्थित केला आहे. फरार तीन आरोपींना आजच्या आज अटक न केल्यास जिल्हा पोलीस मुख्यालयासमोर विद्यार्थिनींसह एआयएसएफ तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही वैभव चोपकर यांनी दिला आहे.