भंडारा : अरोमिरा नर्सिंग कॉलेजमध्ये एएनएमचे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीची निवड शासकीय नर्सिंग महाविद्यालय, भंडारा येथे झाली. मात्र प्रवेशासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या कागदपत्रांची सत्यप्रत शेवटच्या क्षणापर्यंत न मिळाल्यामुळे तिची शासकीय नर्सिंग कॉलेजमधील प्रवेशाची सुवर्ण संधी हुकली असून तिला प्रवेशापासून वंचित राहावे लागले. अरोमिरा नर्सिंग महाविद्यालयाच्या चुकीची शिक्षा या विद्यार्थिनीला भोगावी लागणार असून त्यामुळे ती नैराश्यात गेली आहे.
अरोमिरा नर्सिंग कॉलेजमध्ये एएनएमला शिकत असलेली पायल वीरेंद्र बोरकर, रा. सासरा, ता. साकोली या विद्यार्थिनीची भंडारा येथील शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या जीएनएम अभ्यासक्रमासाठी निवड झाली. यादीत तिचे नाव असल्याचे कळताच तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तिने अरोमिरा नर्सिंग महाविद्यालयात जाऊन लागणाऱ्या आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची सत्यप्रतसाठी अर्ज केला. मात्र महाविद्यालयाने कागदपत्र देण्यास टाळाटाळ केली असल्याचे पायलने सांगितले. ज्या दिवशी पायलला जयश्री कडू हिने कागदपत्र घेण्यास सांगितले त्याच्या एक दिवस आधी संस्था चालक वर्षा साखरे हिच्यासह जयश्री कडू हिच्यावरही गुन्हा दाखल झाला. त्यानंतर या दोघीही फरार झाल्या. त्यातच कॉलेजला ५ दिवसांच्या सलग सुट्ट्या आल्या. त्यामुळे कागदपत्र मिळविण्यासाठी तिने जिवाचे रान केले. मात्र तिचे सर्व प्रयत्न निरर्थक गेले. काल दिनांक २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजतापर्यंत प्रवेशाची आणि कागदपत्र जमा करण्यास अंतिम फेरी होती. मात्र अखेरपर्यंत कागदपत्रं न मिळाल्यामुळे अखेर तिची शासकीय नर्सिंग कॉलेजमधील प्रवेशाची संधी हातून गेली. काहीही चूक नसताना केवळ अरोमिरा नर्सिंग महाविद्यालयाच्या बेजबाबदार कारभारामुळे सुवर्ण संधी गेल्याचे दुःख पायलने लोकसत्ताशी बोलताना व्यक्त केले. तसेच शासनाने तिची बाजू समजून तिला संधी द्यावी अशी मागणीही तिने केली आहे.
हेही वाचा – पूर्व विदर्भात ‘डेंग्यू’ग्रस्तांची संख्या दुप्पट! कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण? पहा
चार दिवसांपासून मुख्य आरोपी फरार
अरोमिरा नर्सिंग कॉलेजने एएनएमचे शिक्षण घेत असलेल्या १८ विद्यार्थिनींची फसवणूक केल्या प्रकरणी संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली, कर्मचारी राकेश निखाडे व जयश्री कडू यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र गुन्हा दाखल होताच राकेश निखाडे याला अटक करण्यात आली तर मुख्य आरोपी संस्था चालक वर्षा अविनाश साखरे, प्राचार्या सुसन्ना थालापल्ली व जयश्री कडू या तिघीजणी रात्रीच फरार झाल्यात. राकेश निखाडे फरार होऊ नये म्हणून त्याला दुपारी १ वाजतापासून पोलीस ठाण्यात नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र मुख्य आरोपी असलेल्या वर्षा साखरे यासुद्धा फरार होऊ शकतात याची कल्पना असताना भंडारा पोलिसांनी त्यांना विशेष सूट का दिली असा प्रश्न उपस्थित एआयएसएफचे राज्य सचिव वैभव चोपकर यांनी उपस्थित केला आहे. चार दिवस लोटूनही पोलीस विभागाकडून मुख्य आरोपीस अटक करण्यास दिरंगाई झाल्याने पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
हेही वाचा – अबब… तलावाकाठी एकाचवेळी तीन वाघ, बघा व्हिडीओ
राकेश निखाडे याला रात्री उशिरा अटक होताच त्याने तब्येतीचा बहाणा केल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र आता त्याने जुन्या एका आजाराचा बहाणा करून सर्जरीची मागणी केली आहे. विशेष म्हणजे मेडिकलमध्ये त्याची मागणी मान्य केल्याने जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासन आरोपीस पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप केला जात आहे. विशेष म्हणजे गुन्हा दाखल होण्यापूर्वी राकेश निखाडे याची प्रकृती ठणठणीत होती शिवाय तो कामावर नियमित जात होता.