अकोला : वसुलीसाठी वणवण फिरणाऱ्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची धनादेशाने मात्र डोकेदुखी वाढवली आहे. महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांनी विजबिल भरण्यासाठी दिलेल्या धनादेशांपैकी अकोला परिमंडळात दरमहा सुमारे १९० धनादेश बाऊंस होत असल्याचे समोर आले. त्यामुळे प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकारसह दंड संबंधित ग्राहकाच्या पुढील महिन्याच्या वीज बिलामध्ये इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येतो. ग्राहकाला ७५० रुपये दंड सोसावा लागतो.

महावितरणपुढे विज बिल वसुलीचे मोठे आव्हान आहे. अकोला परिमंडळातील काही वीज ग्राहक दरमहा बिलांचा भरणा धनादेशाद्वारे करतात. यामध्ये मात्र दरमहा सरासरी १९० ग्राहकांच्या वीजबिलांचे धनादेश न वठता परत येत असल्याचे दिसून आले. अकोला परिमंडळात मागील वर्षभरात दोन हजार २७३ चेक बाऊंस झालेले आहेत. त्यामध्ये अकोला जिल्हा एक हजार ०१३, बुलढाणा जिल्हा ७०४ आणि वाशीम जिल्ह्यातील ५५६ धनादेशाचा समावेश आहे. धनादेशावर चुकीची तारीख, खाडाखोड, चुकीची स्वाक्षरी, चुकीचे नाव, खात्यात पुरेशी रक्कम नसणे आदी कारणांवरून धनादेश अनादरीत होत असल्याचे आढळून आले. धनादेश दिल्यानंतर तो जमा होण्यासाठी साधारणतः तीन ते पाच दिवसांचा कालावधी लागतो. धनादेश दिल्यानंतर वीजबिल भरल्याची पावती त्याच दिवशी मिळत असली तरी धनादेशाची रक्कम जमा झाल्याच्या तारखेलाच किंवा चेक जमा केल्यापासून तिसऱ्या दिवशी वीजबिल भरणा ग्राह्य धरला जातो. त्यामुळे मुदतीच्या एक-दोन दिवस आधी दिलेल्या धनादेशाची रक्कम मुदतीनंतर जमा झाल्याने पुढील वीजबिलामध्ये थकबाकी दिसून येते.

चेक अनादर (बाऊंस) झाल्यास किंवा न वठता परत आल्यास ग्राहकाला प्रत्येक वीजबिलासाठी ७५० रुपये बँक प्रशासकीय शुल्क आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येत असल्याने ग्राहकांना मोठा भुर्दंड बसतो. संकेतस्थळ तसेच महावितरण ॲपद्वारे चालू व मागील वीजबिल पाहणे आणि त्याचा ‘ऑनलाइन’ भरणा करणे लघुदाब वीज ग्राहकांसाठी घरबसल्या शक्य झाले आहे. बिलाचा ऑनलाइन भरणा केल्यास ०.२५ टक्के (५०० रुपयांच्या मर्यादेत) सूट देण्यात येते. त्यामुळे ग्राहकांनी धनादेशाऐवजी विविध ऑनलाइन पर्यायाचा वापर करावा, असे आवाहन महावितरणच्या अकोला परिमंडळाने केले आहे.

…तर प्रत्येक बिलावर दंड

अनादरीत झालेल्या एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिलांचा भरणा केलेला असल्यास प्रत्येक वीजबिलासाठी दंडात्मक रक्कम लावण्यात येत आहे. यासोबतच धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सोय सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात येते.

Story img Loader