नागपूर: गेल्या काही दिवसांपासून ऑटोचालक मनमानी करीत वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत प्रवाशांसोबतही आरेरावी करीत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी ऑटोचालकांविरुद्ध अभियान राबवले. शहरातून जवळपास ६०० वर ऑटो पोलिसांनी जप्त केले. वाहतूक पोलिसांनी केलेल्या अचानक कारवाईमुळे ऑटोचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलीस उपायुक्त आणि सर्वच परिमंडळाचे पोलीस निरीक्षकांची बैठक घेतली. आगामी हिवाळी अधिवेशाचा बंदोबस्त लक्षात घेता शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार सदर वाहतूक परिमंडळाचे प्रभारी अधिकारी प्रशांत अन्नछत्रे यांनी वाहतुकीचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोचालकांविरुद्ध कारवाई सुरू केली.
हेही वाचा… बुलढाणा समृद्धी महामार्ग अपघात: घोषणा २५ लाखाची, मिळाले मात्र पाच लाख रुपये
सायंकाळपर्यंत दीडशेवर ऑटोचालकांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच ५७ ऑटोंवर जप्ती कारवाई करण्यात आली. काही ऑटोचालकांवर सिग्नल तोडणे, बॅच न वापरणे, गणवेश न वापरणे आणि क्षमतेपेक्षा जादा प्रवाशी भरणे, इत्यादी नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.