नागपूर : नववर्षाच्या जल्लोषात असामाजिक तत्त्वांचा सर्वसामान्यांना त्रास होऊ नये म्हणून तब्बल २ हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. पोलिसांकडून ३० ठिकाणी नाकाबंदी केली जाणार असून मद्यपींना आवरण्यासाठी ३० ठिकाणी विशेष बंदाेबस्त ठेवला जाणार आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
नागपुरातील पोलीस भवन येथे झालेल्या शुक्रवारच्या पत्रकार परिषदेत अमितेश कुमार पुढे म्हणाले, शासनाने नववर्षाच्या स्वागतानिमित्त नागरिकांचे मनोरंजन व्हावे म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्रीपासून पहाटे ५ पर्यंत उपाहारगृह, हाॅटेल्स, रेस्ट्राॅरेन्ट सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे या सगळ्यांची बैठक घेत सगळ्यांना अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घेत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची सूचना केली आहे.
दरम्यान, आवश्यक खासगी सुरक्षा रक्षकांची जबाबदारी संबंधित आयोजकांची राहील. येथे महिलांसोबत अनुचित प्रकार घडू नये म्हणूनही त्यांना काळजी घ्यावी लागेल. स्वत:हून नियम पाळल्या जात असलेल्या ठिकाणी पोलीस जाणार नाहीत. परंतु कुठे अनुचित प्रकार घडताना दिसल्यास प्रतिष्ठान बंद करायला लावतील. परवानगी असलेल्या हाॅटेल्समध्ये पहाटे ५ पर्यंत मद्य उपलब्ध करण्याची परवानगी आहे. परंतु परवानगी नसलेल्या उपाहारगृहासह इतर ठिकाणी मद्य दिले जात असल्यास कारवाई केली जाईल. रस्त्यांवर हुडदंग घातला जाऊ नये म्हणून पोलिसांनी ३० ठिकाणी नाकाबंदीची तयारी केली आहे. त्यात ग्रामीणहून शहरात येणाऱ्या महामार्गांचाही समावेश आहे. तर शहरातील महत्त्वाच्या भागात ड्रंक ॲण्ड ड्राईव्हच्या कारवाईसाठी ३० ठिकाणी पोलीस तैनात राहतील. पोलिसांची कारवाई पारदर्शी व्हावी म्हणून हे पथक सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या ठिकाणी राहील. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी कलम १४४ अन्वये अधिसूचनाही काढल्याची माहिती त्यांनी दिली.
३५ कोटी रुपयांचे चालान थकीत
पोलिसांनी ई-चालान देणे सुरू केल्यापासून नागपूर शहरातील सुमारे ३५ कोटी रुपयांचे चालान थकीत आहे. हे डिजिटल चालान नागरिकांनी संबंधित ॲपवर भरण्याची सोय आहे. ते भरण्याचे आवाहनही अमितेश कुमार यांनी केले. चालान न भरल्यास नववर्षात चालान भरण्याबाबत मोठी मोहीम हाती घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.