महेश बोकडे
नागपूर : अधिवेशनासाठी येणाऱ्या विधानसभा व विधान परिषद सदस्यांची येथील आमदार निवासात मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली आहे. इमारत क्रमांक एकमध्ये माजी मुख्यमंत्री व शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नावाने खोल्या आरक्षित आहेत.
पहिल्या क्रमांकाच्या इमारतीत सगळ्याच पक्षांतील दिग्गज नेत्यांसाठी खोल्या आरक्षित आहेत. उद्धव ठाकरे यांना इमारत क्रमांक १ मधील खोली क्रमांक २ देण्यात आली आहे. ही खोली इमारतीच्या तळ माळ्यावर आहे. नाना पटोले यांना पहिल्या माळ्यावरील खोली क्रमांक १०९, चंद्रशेखर बावनकुळे यांना पहिल्या माळ्यावरील १२७ क्रमांकाची खोली मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पहिल्या माळ्यावरील खाेली क्रमांक १०५, आदित्य ठाकरे यांना चौथ्या माळ्यावरील खोली क्रमांक ४०६ देण्यात आली आहे.
हेही वाचा >>>झाशीतील या कामामुळे नागपूर-अमृतसर रेल्वेगाडी रद्द
इमारत क्र. दोनमध्ये अद्ययावत स्वागत कक्ष
क्रमांक २ इमारतीतील स्वागत कक्ष नवीन तयार करण्यात आले आहे. येथील अनेक खोल्यांचे नूतनीकरणही करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीची खोल्यांबाबतची तक्रार यंदा दूर होण्याची शक्यता आहे.
किती आमदार थांबणार?
आमदार निवासात सर्व आमदारांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी सर्वच येथे थांबत नाहीत. काही हॉटेल्समध्ये थांबतात. त्यांचे स्वीय सहाय्यक, कार्यकर्ते तेथे थांबत असतात. काही आमदार नातेवाईकांकडे मुक्कामी असतात. स्थानिक आमदारांच्या खोल्या कार्यकर्त्यांच्याच ताब्यात असतात. त्यामुळे यंदाच्या अधिवेशनात किती विधानसभा सदस्य आमदार निवासात थांबतात व किती बाहेर याबाबत उत्सुकता आहे.
आमदार निवास परिसर स्वच्छ
हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने आमदार निवासातील सगळ्याच इमारतींसह खोल्यांमध्ये रंगरंगोटी करण्यात आली आहे. येथील स्वागत कक्ष, प्रतीक्षालय आणि इतरही भागाचे सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. आमदार निवास परिसरात स्वच्छतेकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.